राहुल गांधी यांच्या भाषणात उल्लेख असलेल्या पुस्तकांची सूची सादर करण्याचा पुणे न्यायालयाचा आदेश !
पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा नोंद केला आहे. या वेळी सादर केलेल्या पुराव्यांचे अन्वेषण पुणे येथील न्यायालयात करण्यात आले. गांधी यांनी केलेले भाषण लेखी स्वरूपात द्यावे, तसेच त्यांच्या भाषणात उल्लेख असलेल्या पुस्तकांची सूची न्यायालयात सादर करावी, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांच्या न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिला.
‘इंग्लंड येथील एका कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी खोटी माहिती सांगत राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला’, असा दावा सात्यकी सावरकर यांनी केला असून त्यांच्या विरोधात पुणे न्यायालयामध्ये मानहानीचा दावाही प्रविष्ट केला आहे.