समीर वानखेडे यांच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयाकडून ८ जूनपर्यंत संरक्षण !
मुंबई – भारतीय महसूल सेवा अधिकारी समीर वानखेडे यांच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयाकडून ८ जूनपर्यंत संरक्षण देण्यात आले आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला असे निर्देश देतांना न्यायालयाने समीर वानखेडे यांच्याकडून प्रसारमाध्यमांशी न बोलणे, पुराव्यांशी छेडछाड न करणे, अन्वेषणात हस्तक्षेप न करणे आणि चौकशीला उपस्थित रहाणे याविषयी लेखी ग्वाही घेतली आहे.
२२ मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हे निर्देश दिले. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या मुंबई विभागाच्या संचालकपदावर असतांना वर्ष २०२१ मध्ये प्रसिद्ध अभिनेते शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याची कारागृहातून सुटका करण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून त्यांचे अन्वेषण चालू आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईहून गोवा येथे जाणार्या एका क्रूझवर टाकलेल्या धाडीमध्ये आर्यन खान याला अमली पदार्थ नियंत्रण पथकाने कह्यात घेतले होते. समीर वानखेडे यांच्यावरील आरोप त्यांनी फेटाळले आहेत.