परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या रथोत्सवाच्या वेळी सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. श्री. रमेश कविटकर
अ. ‘मंगलमय रथोत्सव चालू होण्यापूर्वी कडक ऊन होते; मात्र रथोत्सव चालू झाल्यानंतर मला गारवा जाणवू लागला.
आ. ‘मंगलमय रथोत्सवात अनपेक्षितपणे प्रत्यक्ष गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) पाहून मला आनंद झाला.’
२. सौ. अनुष्का शिरोडकर
अ. ‘रथोत्सवातील एका चारचाकीवर गुरुमाऊलींचे छायाचित्र लावले होते. ते छायाचित्र मी बघत होते. तेव्हा ‘गुरुमाऊली माझ्याशी बोलत आहेत’, असे मला जाणवले. छायाचित्रातील गुरुदेवांचे डोळे बोलत होते. तेच मी अनुभवत होते.
आ. त्या वेळी साधिका कु. पूजा शिरोडकर यांनी सांगितले, ‘‘प्रत्यक्षात गुरुमाऊली आले आहेत.’’ तेव्हा माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले.’
३. कु. पूजा शिरोडकर
अ. ‘ रथोत्सव चालू झाल्यावर मला आकाशात पिवळसर रंगाचा प्रकाश दिसला.
आ. रथात विराजमान असलेल्या सनातनच्या तीन गुरूंना (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना) पाहून माझा पुष्कळ कृतज्ञताभाव दाटून आला.
इ. मला वाटले, ‘माझ्या अनेक जन्मांचे पुण्य फळाला आले; म्हणून मला साक्षात् भगवंताचे दर्शन झाले.’
४. श्री. सीताराम म्हापणकर (वय ६६ वर्षे)
अ. ‘रथोत्सवाच्या वेळी मला साक्षात् वैकुंठात गेल्याचा आनंद अनुभवता आला.
आ. सद्गुरु आणि संत यांच्या दर्शनाने माझ्या जीवनाचे सार्थक झाले.’
५. श्री. एकनाथ सावंत (वय ७० वर्षे)
अ. ‘रथ आश्रमातून निघाला आहे’, असे समजल्यावर माझ्याकडून वृत्ती अंतर्मुख करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा माझा ‘श्री विष्णवे नम: ।’ हा नामजप चालू झाला. प्रत्यक्ष विष्णुस्वरूप नारायणाचे रूप पाहून त्याचा मला उलगडा झाला.
आ. साक्षात् गुरुरूप प्रत्यक्ष पाहिल्यावर माझा प्रथम विश्वासच बसेना. माझा भाव जागृत झाला.’
इ. ‘प्रत्यक्ष वैकुंठात हा सोहळा चालू आहे’, असे मी अनुभवले.’
६. सौ. स्मिता एकनाथ सावंत (वय ६७ वर्षे)
अ. ‘पक्षांचे थवे आकाशात उडतांना दिसत होते. त्या वेळी ‘ते गुरुदेवांनाच भेटण्यासाठी आले आहेत’, असे मला वाटले.
आ. रथोत्सवातील एका चारचाकीवर लावलेल्या परम पूज्यांच्या छायाचित्राकडे पहात असतांना मला त्यांचे अस्तित्व जाणवले. ‘ते आमच्याकडे पहात आहेत आणि आमच्याशी बोलत आहेत’, असे मला जाणवले.
इ. मी अशा भावावस्थेत असतांना मला प.पू. गुरुदेवांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या दर्शनाने माझे मन तृप्त झाले. माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.’
७. सौ. दिया देवदत्त शिरोडकर
अ. ‘रथोत्सव चालू झाल्यावर मला आकाशात निळसर रंगाचा प्रकाश दिसला.
आ. पक्षी, झाडे आणि फुले आनंदाने नाचत होती.
इ. मला वाटले, ‘माझे अनेक जन्मांचे पुण्य फळाला केले; म्हणून मला साक्षात् श्रीरामाचे दर्शन झाले. श्री गुरुचरण सोडून कुठेच जाऊ नये. त्यांचीच सेवा करावी आणि तिथेच आनंद आहे.’
८. सौ. उषा शंकर निकम (वय ६२ वर्षे)
अ. प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या २ दिवस आधीपासून मला प.पू. गुरुदेवांची फार आठवण येत होती. ‘प.पू. गुरुदेवांनी माझ्यासाठी किती केले !’, त्याविषयी आठवून माझा कृतज्ञताभाव जागृत होत होता.
आ. ‘आम्हाला रथोत्सव बघायला जायचे आहे’, असे समजल्यावर ‘माझी पात्रता नसतांना परम पूज्यांनी मला बोलावले’, असे वाटून माझी कृतज्ञता व्यक्त झाली.
इ. साधक ‘परम पूज्य येथेच आहेत’, असा भाव ठेवा’, असे सांगत होते. तेव्हा ‘परम पूज्य आज आम्हाला दर्शन देणार’, याची मला निश्चिती झाली.
ई. रथ लांबून दिसल्यावर माझा भाव जागृत झाला. मला वाटले, ‘आज मला परम पूज्य देवाच्या दरबारात घेऊन आले.’
८. श्री. रवि राऊळ
अ. ‘आम्हाला मार्गाच्या बाजूला उभे रहायला सांगितले होते. तेव्हा उष्णता फार जाणवत होती. मला वाटत होते ‘सावलीत जावे’; मात्र रथ येत असल्याचा आवाज आल्यावर आम्हाला उष्णता जाणवत नव्हती. तेव्हा वातावरण एकदम थंड झाले. ‘आम्ही उन्हात अनवाणी उभे आहोत’, हे विसरून गेलो.
आ. ‘प.पू. गुरुदेवांच्या सभोवती पिवळ्या रंगाचे वलय आहे’, असे मला दिसत होते. मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते.
इ. आम्ही अनुमाने ३ घंटे रथोत्सव बघण्यासाठी थांबलो होतो. एरव्ही मला कामानिमित्त सतत भ्रमणभाष येत असतात; पण त्या वेळी मला एकही भ्रमणभाष आला नाही. मी पूर्ण सोहळा मनापासून अनुभवू शकलो. ही गुरुदेवांचीच कृपा आहे.’
९. श्री. उमाजी मष्णू चव्हाण
अ. ‘आम्हाला मार्गाच्या दोन्ही बाजूला उभे रहायला सांगितले. तेव्हा मला वाटले, ‘श्री महालक्ष्मी आणि प.पू. गुरुमाऊली यांचे संभाषण चालू आहे. श्री महालक्ष्मी गुरुदेवांना सांगत आहे, ‘हा रथ तुमचाच आहे. तुम्ही यात विराजमान व्हा.’
आ. मी नामजपात मग्न असतांना गुरुदेवांचा रथ जवळ आला. माझे गुरुदेवांकडे लक्ष गेल्यावर माझ्या शरिरावर रोमांच आले. माझा भाव जागृत झाला.
१०. सौ. वैशाली संदेश गावडे
हिंदु राष्ट्राची विजय पताका घेऊन चालले श्रीहरि !
अ. मला आणि माझ्या यजमानांना ‘मंगलमय रथोत्सवासाठी जायचे आहे’, असे समजल्यावर मला कृतज्ञता वाटली.
आ. गुरुमाऊलींच्या जन्मोत्सवाच्या दिवशी ‘मला प्रत्यक्ष श्रीविष्णूचे निवासस्थान असणार्या भूलोकातील वैकुंठ अशा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या जवळ जाता येईल. मला तेथील हवेत असणारा गुरुदेवांचा उच्छ्वास आणि चैतन्य अनुभवता येईल’, या विचारानेच माझी भावजागृती झाली.
इ. प्रत्यक्ष जन्मोत्सवाच्या दिवशी ‘सकाळपासूनच घरी मोठा सोहळा आहे’, अशीच देव सिद्धता करून घेत होता. मी श्री गुरूंचा जन्मोत्सव घरी साजरा करून त्यांना मनोभावे प्रार्थना केली, ‘हे कृपाळू गुरुमाऊली, आज मला रथोत्सवामध्ये अधिकाधिक चैतन्य अनुभवता येऊ दे.’
ई. मी निसर्गदेवतेला प्रार्थना करत होते. माझा नामजप चालू होता. एवढ्यात ‘आश्रमाकडून रथ पुढे येत आहे’, असे मला जाणवले. आम्हाला मंत्रघोष ऐकू येत होता. आम्ही नमस्काराच्या मुद्रेत उभे होतो. समोर दृष्टी गेल्यावर साधक, संत आणि सद्गुरु रथोत्सवामध्ये सहभागी झालेले दिसले. त्यांच्या पाठीमागील रथात साक्षात् श्रीविष्णु (परात्पर गुरु डॉ. आठवले) आरूढ असलेले दिसले. स्वर्गीय सोहळा ‘याची देही, याची डोळा’ अनुभवतांना ‘हिंदु राष्ट्राची विजय पताका घेऊन सर्व साधक साक्षात् श्रीविष्णूच्या समवेत मार्गक्रमण करत आहेत’, असे मला वाटत होते.
उ. मला रथोत्सवात प.पू. दास महाराज यांचे दर्शन झाले. तेव्हा मला जाणवले, ‘श्रीरामाचा निस्सीम भक्त मारुतिरायाही या रथोत्सवात सहभागी झाला आहे.’
देव भावाचा भुकेला । धावी भक्तांच्या हाकेला ।। १ ।।
देव अन् भक्त यांचा हा भावसोहळा ।
अनुभवला याची देही, याची डोळा ।। २ ।।
११. श्री. संदेश विष्णू गावडे
अ. ‘रथ लांबून येतांना ‘रथात गुरुदेव आरुढ आहेत’, यावर क्षणभर माझा विश्वासच बसला नाही. ते मला श्रीकृष्णाच्या विराट रूपात दिसत होते. कितीही वर बघितले, तरी त्यांचे रूप आणखी आणखी विराट दिसत होते. मी त्यांच्या समोर अतिशय सूक्ष्म रूपात दिसत होतो.
आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची दृष्टी आणि हसणे चैतन्यदायी जाणवले. त्यांची माझ्यावर दृष्टी पडल्यावर ‘माझ्यावरील आवरण दूर होत आहे’, असे मला जाणवले.
नर जन्मा येऊनी, भाग्य फळा आले ।
श्री गुरूंसी मी आज पाहिले ।।’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ३.५.२०२३ )
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |