पू. सत्यनारायण तिवारी यांच्या संत सन्मानसोहळ्याच्या वेळी त्यांच्या मुलीला जाणवलेली सूत्रे
१. पू. सत्यनारायण तिवारी यांची खालावलेली शारीरिक स्थिती
‘२३.४.२०२३ या दिवशी माझ्या बाबांना (पू. सत्यनारायण तिवारी यांना) भेटण्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आमच्या घरी येणार होत्या. त्या दिवशी बाबांची शारीरिक स्थिती ठीक नव्हती. आदल्या दिवशी साधक बाबांचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करत असतांना ते २ मिनिटेही मान वर करून आणि डोळे उघडे ठेवून बसू शकत नव्हते. त्यांना पुष्कळ थकवा होता. २३.४.२०२३ या दिवशीही बाबा अधिक वेळ पलंगावर निजून होते.
२. ‘पू. सत्यनारायण तिवारी संत सन्मानसोहळ्यासाठी केवळ १० मिनिटे बसू शकतील’, असे आरंभी वाटणे
बाबांच्या संत सन्मानसोहळ्याच्या आधी मला वाटत होते, ‘ते जेमतेम १० मिनिटे बसू शकतील.’ त्या वेळी मी बाबांना म्हटले, ‘‘तुम्ही सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारा. ते काय म्हणतात ?’, हे पहा.’’ त्यावर बाबा मला म्हणाले, ‘‘प.पू. डॉक्टर सूक्ष्मातून सांगत आहेत, ‘कार्यक्रमाला बसा.’’ प्रत्यक्षात ‘ते किती वेळ बसू शकतील ?’ याचा मला अंदाज येत नव्हता.
३. चैतन्य आणि आनंद यांच्या स्तरावर झालेला पू. सत्यनारायण तिवारी यांचा संत सन्मानसोहळा !
३ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि पू. सत्यनारायण तिवारी यांच्यात चैतन्याच्या स्तरावर संवाद होत असल्याने पू. सत्यनारायण तिवारी सोहळ्याच्या वेळी अडीच घंटे बसू शकणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आमच्या घरी आल्यावर बाबांना त्यांच्या समोर आणले. त्या वेळी बाबा अडीच घंटे एखाद्या निरोगी व्यक्तीप्रमाणे बसू शकले. तेव्हा त्यांना कसलाच शारीरिक त्रास झाला नाही. याचे माझ्या आईला (सौ. सविता तिवारी यांना) आश्चर्य वाटले. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि बाबा यांच्यात चैतन्याच्या स्तरावर संवाद होत होता. तेथे शारीरिक आणि मानसिक या स्तरांवर काहीच नव्हते. ‘सोहळा आणि त्यातील संवाद आध्यात्मिक स्तरावर असल्याने बाबा बसू शकले’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.
३ आ. पू. सत्यनारायण तिवारी यांना देहाची जाणीव नसणे आणि ते परमानंदात असणे : आरंभी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ बाबांना म्हणाल्या, ‘‘तुम्ही रुग्णाईत आहात; म्हणून मी तुम्हाला भेटायला आले आहे.’’ तेव्हा बाबा म्हणाले, ‘‘मी कुठे रुग्णाईत आहे ? मी पूर्ण बरा आहे.’’ तेव्हा ‘बाबांना देहाची जाणीव नसून ते आध्यात्मिक स्तरावर बोलत आहेत’, असे मला वाटले. ते परमानंदात होते आणि त्यांना सर्वत्र चैतन्य अनुभवायला येत होते.
३ इ. ‘सोहळ्यात झालेल्या संवादाची संहिता विधात्याने आधीच लिहून ठेवली आहे’, असे वाटणे : संपूर्ण सोहळ्यात ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांना मी, आई अन् बाबा देत असलेली उत्तरे ही विधात्याने आधीच लिहून ठेवलेली संहिता आहे’, असे मला अनुभवायला येत होते. त्या वेळी आम्हाला वेळेचे भान नव्हते. ‘आमच्यातील भावसंवाद दोन ते अडीच घंटे चालू होता’, हे संवाद संपल्यानंतर आमच्या लक्षात आले.
४. साधकांना झालेला आनंद !
पू. बाबांचा संतसन्मान सोहळा झाल्यानंतर मला नातेवाईक, रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील, संभाजीनगर येथील, तसेच अन्य ठिकाणचे अनेक साधक यांचे भ्रमणभाष अन् लघुसंदेश आले. साधकांना झालेला आनंद पाहून आमचा आनंद द्विगुणित झाला. या सोहळ्यात असलेली माझी भावस्थिती ३ दिवस अखंड टिकून होती.’
– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी (पू. तिवारीकाकांची मुलगी), नागेशी, गोवा. (२८.४.२०२३)
|