पू. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) यांच्या संतसोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये !
‘२३.४.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. सत्यनारायण तिवारीकाका यांच्या नागेशी येथील घरी जाऊन त्यांच्याशी अनौपचारित संवाद साधला. त्यानंतर त्यांनी ‘पू. सत्यनारायण तिवारीकाका हे सनातनच्या १२४ व्या संतपदी विराजमान झाले’, असे घोषित केले. या संतसोहळ्याचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण लेखबद्ध करूत हा लेख कृतज्ञताभावाने पुष्पांच्या स्वरूपात पू. सत्यनारायण तिवारी यांच्या सुकोमल चरणी अर्पण करत आहे.
१. पू. सत्यनारायण तिवारीकाका यांनी मागील २० जन्मांमध्ये केलेल्या साधनेचे रहस्य !
१ अ. कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण : पू. सत्यनारायण तिवारीकाका हे गत जन्मी भारतामध्ये हिंदु कुळात जन्माला आले होते. त्यांनी मागील २० जन्मांमध्ये ‘कर्मयोग’ आणि ‘ध्यानयोग’ या योगमार्गांनुसार तीव्र साधना केली होती. मागील १९ व्या जन्मामध्ये त्यांना हिमालयातील ‘यजुस’ नामक एक तपस्वी ऋषींचा अनुग्रह मिळाला होता. त्या ऋषींच्या कृपेमुळे त्यांची ध्यानयोगानुसार साधना झाली. एक जन्म पूर्वी त्यांच्या आयुष्यात ‘प.प. टेंब्येस्वामी’ (प.प. वासुदेवानंद सरस्वती) हे महाराष्ट्रातील कर्मयोगी संत आले होते. त्यांच्याकडून त्यांना ‘हठयोग’ आणि ‘ध्यानयोग’ या दोन्ही योगमार्गांची दीक्षा मिळाली होती. त्यामुळे पू. सत्यनारायण तिवारीकाका यांची या जन्मी ‘देह यातना भोगतही जागृत ध्यानावस्थेत राहून परिपूर्ण कर्म करत रहाणे’, ही साधना झाली. या जन्मामध्ये त्यांच्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा झाल्यामुळे ‘ध्यानयोग’, ‘कर्मयोग’ आणि ‘हठयोग’ या योगमार्गांना गुरुकृपायोगाची जोड मिळाली. त्यामुळे या जन्मी त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांनी संतपद गाठले. – कु. मधुरा भोसले
१ आ. कु. आरती तिवारी (मुलगी) यांना पू. सत्यनारायण तिवारी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ आ १. ‘पू. बाबा हठयोगी असावेत’, असे जाणवणे : कु. मधुरा भोसले यांनी लिहिलेले वरील सूत्र बरोबर आहे.‘पू. बाबा हठयोगी असावेत’, असा विचार माझ्या मनातही आला होता; कारण पू. बाबा १ – २ घंटे पूजेची पूर्वतयारी आणि ५ – ६ घंटे ‘पूजा करणे, स्तोत्र म्हणणे, पोथी वाचन करणे’, असे काही न खाता पिता करायचे. तेव्हा ‘सामान्य माणसाला हे शक्यच नाही’, असे वाटून ‘एके ठिकाणी एवढा वेळ बसणे हे ही निराळेच आहे’, हे लक्षात येऊन ‘पू. बाबांनी कोणत्या तरी जन्मात हठयोगाची साधना केली असावी’, असे मला वाटले होते. ते त्यांचे प्रत्येकच कर्म परिपूर्ण करायचे. त्यांचे कपडे धुणे, कपड्यांना इस्त्री करणे, भाजी विकत आणल्यावर ती शीतकपाटात व्यवस्थितपणे ठेवणे इत्यादी त्यांची कर्मर्े पाहून माझे मन प्रसन्न व्हायचे.
१ आ २. ‘पू. बाबा ‘ध्यानयोगी’ असावेत’, असे जाणवणे : कु. मधुरा भोसले यांनी लिहिलेले वरील सूत्र बरोबर आहे. पू. बाबा नेहमीच त्यांच्या विश्वात रममाण असतात. ते अत्यंत कमी बोलतात. तसेच बर्याचदा त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘त्यांचे जागृतपणी ध्यान चालू आहे’, असे विचार माझ्या मनात येत होते. (त्या वेळी त्यांचे नेत्र अर्धाेन्मीलित असल्याचे जाणवले.) संभाजीनगरला ‘राधामोहन मंदिर’ नावाचे एक मंदिर आहे. आमच्या काही नातेवाइकांनी पू. बाबांविषयी आम्हाला सांगितले की, ते विवाहापूर्वी घंटोन्घंटे आणि विवाहानंतर काही वेळा त्या मंदिरात जाऊन डोळे मिटून ध्यान लावून बसायचे.
– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. सत्यनारायण तिवारीकाका यांचे संतपद घोषित केल्यानंतर त्यांच्या घरातील तापमान अल्प होणे
पू. सत्यनारायण तिवारीकाका यांच्या घरातील वातावरण उष्ण असल्याचे मला सूक्ष्मातून जाणवत होते; (हो. हे सूत्र बरोबर आहे. २३.२.२३ या दिवशी झालेल्या संतसोहळ्यात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आमच्या घरी येण्यापूर्वी घरामध्ये स्थुलातूनही पुष्कळ उष्णता जाणवत होती. – कु. आरती तिवारी) पण जेव्हा त्यांच्या घरामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ पोचल्या, तेव्हा त्यांच्या घरामध्ये लख्ख पिवळा प्रकाश पसरून घरातील वातावरण हळूहळू शीतल होऊ लागले. जेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. सत्यनारायण तिवारीकाका हे ‘संतपदी’ विराजमान झाल्याचे घोषित केले, तेव्हा पू. सत्यनारायण तिवारीकाका यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात सत्त्वलहरी घरात पसरल्या. त्यामुळे घरातील रज-तमात्मक लहरी नष्ट होऊन सर्वत्र सत्त्वगुणी लहरी पसरल्या आणि घरातील संपूर्ण वातावरण पुष्कळ शीतल झाल्याचे मला सूक्ष्मातून जाणवले.
३. पू. सत्यनारायण तिवारीकाका यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित केल्यावर त्यांच्या कुंडलिनीशक्तीवर झालेला परिणाम
३ अ. वर्ष २०१९ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यानंतर सूक्ष्म स्तरावर झालेली प्रक्रिया : वर्ष २०१९ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यानंतर पू. सत्यनारायण तिवारीकाका यांच्या कुंडलिनीशक्तीचा प्रवाह त्यांच्या आज्ञाचक्रापर्यंत पोचला. त्यामुळे जेव्हा श्री. सत्यनारायण तिवारीकाका यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती, तेव्हा त्यांचा लिंगदेह महर्लाेकातील वायूमंडलाशी जोडला गेला आणि त्यांच्या स्थूलदेहाच्या भोवती दिव्य निळसर रंगाच्या प्रकाशाचे महर्लाेकाचे वायूमंडल सूक्ष्मातून निर्माण झाले अन् सर्वत्र पारिजातकाच्या फुलांचा सुगंध दरवळला.
३ आ. संतपद प्राप्त केल्यावर सूक्ष्म स्तरावर झालेली प्रक्रिया : २३.४.२०२३ या दिवशी पू. सत्यनारायण तिवारीकाका यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित झाले, तेव्हा त्यांच्या कुंडलिनीशक्तीचा प्रवाह त्यांच्या सहस्रारचक्रापर्यंत जाऊन त्यांचे सहस्रारचक्र जागृत झाले. तेव्हा त्यांच्या सहस्रारचक्राच्या ठिकाणी ज्ञानाचे पिवळे कमळ उमलले आणि त्यांना ‘अहं ब्रह्मास्मि ।’, म्हणजे ‘मी ब्रह्म आहे’, हा आत्मसाक्षात्कार झाला. त्यांनी संतपद प्राप्त केल्यामुळे त्यांच्या स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही देहांभोवती पिवळसर रंगाच्या प्रकाशाने युक्त असलेले आणि चंदनाचा सुवास दरवळणारे जनलोकाचे वायूमंडल सूक्ष्मातून निर्माण झाले.
– कु. मधुरा भोसले
४. पू. तिवारीकाका यांच्या विविध आध्यात्मिक अवस्थांविषयी कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण आणि त्याविषयी कु. आरती तिवारी यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
पू. तिवारीकाका हे ‘अवलिया संत’ असून त्यांच्या पुढील आध्यात्मिक अवस्था आहेत.
४ अ. पू. तिवारीकाकांची पैशाचिक अवस्था असणे
४ अ १. कु. मधुरा भोसले : या अवस्थेत मनुष्य पिशाचाप्रमाणे, म्हणजे विक्षिप्त वागत असतो. पू. तिवारीकाकांच्या पैशाचिक अवस्थेमुळे ते इतरांवर रागावून बोलणे, शिव्या देणे, इत्यादी कृती करत होते.
४ अ २. कु. आरती तिवारी : वरील सूत्र बरोबर आहे. पू. बाबा आजारी पडण्यापूर्वीच्या काळात पू. बाबा मधेमधे घरच्यांना ‘शिवीगाळ करणे, रागावून बोलणे’, असे करत होते. वर्ष २०२१ मध्ये मी त्यांना भेटण्यासाठी संभाजीनगर (महाराष्ट्र) येथे गेले होते. तेव्हा ते मधेच शिवीगाळ करायचे. तेव्हा मला प.पू. भक्तराज महाराजांचे स्मरण होऊन शिवीगाळ केल्यावर मला ‘राग येणे किंवा वाईट वाटणे’, असे मानसिक त्रास झाले नाहीत. तसेच वर्ष २०२२ मध्ये ते गोवा येथे माझ्याकडे आल्यावरही मधे मधे मला शिवीगाळ करणे, काही वेळा रागावून बोलणे, असे केले. एकदा मी त्यांची सेवा करत असतांना त्यांनी मला नखांनी ओरबाडले होते.
४ अ ३. कु. मधुरा भोसले : पू. तिवारीकाकांना त्रास देणार्या वाईट शक्तींच्या प्रभावामुळे त्यांचे वागणे पिशाचाप्रमाणे होते. ते संत व्हायची वेळ जवळ आल्यावर त्यांच्यावरील वाईट शक्तींचा प्रभाव न्यून झाल्यामुळे आणि त्यांच्यातील दैवी शक्ती जागृत झाल्यामुळे त्यांची पैशाचिक अवस्था लोप पावली आणि आता ते सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे वागत आहेत.
४ अ ४. वरील सूत्र बरोबर आहे. – कु. आरती तिवारी
४ आ. पू. तिवारीकाकांची वानस्पत्य अवस्था असणे
४ आ १. कु. मधुरा भोसले : ज्याप्रमाणे ‘वनस्पती’, म्हणजे ‘वृक्ष’ एखाद्या ठिकाणी अनेक वर्ष स्थिर रहातो, त्याप्रमाणे मनुष्यही काही वेळा एकाच ठिकाणी बसून रहातो किंवा पडून रहातो, उदा. अंथरुणाला खिळून रहातो. याला ‘वानस्पत्य अवस्था’, असे म्हणतात. पू. तिवारीकाकांच्या प्रदीर्घ आजारपणामुळे ते अनेक वर्षे अंथरुणाला खिळून राहिल्यामुळे ते वानस्पत्य अवस्थेत आहेत.
४ आ २. कु. आरती तिवारी : वरील सूत्र बरोबर आहे. पू. बाबा गेली अडीच वर्षे अंथरूणाला खिळून आहेत.
४ आ ३. कु. मधुरा भोसले : ही त्यांची ‘वानस्पत्य अवस्था’ आहे. या अवस्थेत त्यांनी त्यांचे देहप्रारब्ध स्वीकारून त्यांचे चित्त भगवंताशी जोडले आहे. त्यामुळे त्यांचे चित्त (अंतर्मन) भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहून ते आत्मानंदात लीन झाले आहेत.
४ आ ४. कु. आरती तिवारी : वरील सूत्र बरोबर आहे. ते कधीच स्वत:च्या आजारपणाविषयी तक्रार करत नाहीत. त्यांच्या मनात भगवंताबद्दल कृतज्ञताभाव असतो. काही वेळा ते तसे व्यक्तही करतात. ते सतत प.पू. डॉक्टरांच्या अनुसंधानात असतात.
४ इ. पू. तिवारीकाकांच्या मनाची बाल्य आणि बुद्धीची प्रगल्भ अवस्था असणे
४ इ १. कु. मधुरा भोसले : जिवाची आध्यात्मिक उन्नती होत असतांना जेव्हा त्याची चित्तशुद्धी होत असते, तेव्हा त्याची देहबुद्धी न्यून होऊ लागते.
४ इ २. कु. आरती तिवारी : वरील सूत्र बरोबर आहे. त्यांची देहबुद्धी न्यून झाली आहे; कारण त्यांना मल-मूत्र विसर्जन झाले, याचीही जाणीव नसते. तसेच त्यांना भूक लागली, तरी त्याची जाणीव नसते.
४ इ ३. कु. मधुरा भोसले : त्यामुळे जिवाच्या मनाचे वय त्याच्या देहाच्या वयापेक्षा न्यून होऊन जीव बाल्यावस्थेत जातो. या अवस्थेत जिवाचे आचार आणि विचार बालकाप्रमाणे निष्पाप, निरागस आणि निरामय असतात.
४ इ ४. कु. आरती तिवारी : वरील सूत्र बरोबर आहे. त्यांचे हसणे एकदम निरागस बालकाप्रमाणे असते. काही वेळा ते लहान मुलाप्रमाणे ‘आई, आई’ अशी हाक मारत असतात.
४ इ ५. कु. मधुरा भोसले : पू. तिवारीकाकांच्या मनाचे वय घटल्यामुळे त्यांना बाल्यावस्था प्राप्त झाली होती. त्यामुळे त्यांचे वागणे बालकाप्रमाणे होते; परंतु आध्यात्मिक ज्ञानामुळे त्यांची बुद्धी अतिशय तीक्ष्ण आणि प्रगल्भ आहे.
४ इ ६. कु. आरती तिवारी : वरील सूत्र बरोबर आहे. स्थुलातून लहान मुलाला जसे भुकेची आणि मलमूत्र विसर्जनाची जाणीव नसल्याने ते खेळत रहाते, तसेच पू. बाबांचे ही आहे. ते काही न बोलता स्वत:च्याच विश्वात असतात; परंतु मधेच एखाद्या वेळी असा आध्यात्मिक संवाद साधतात की, आम्ही अवाक् होतो. पू. बाबांना पू. सौरभदादा पुष्कळ आवडतात. एकदा मी त्यांना पू. सौरभदादांना पहाता यावे, म्हणून व्हिडिओ कॉल लावून दिला होता. तेव्हा स्थुलातून पू. बाबा काही बोलतील किंवा त्यांना ओळखतील अशी त्यांची स्थिती नव्हती; पण त्यांनी जेव्हा पू. सौरभ दादांना पाहिले, तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी धन्य झालो, तुमचे दर्शन मला झाले. मी धन्य झालो. माझ्यावर तुमची कृपादृष्टी असू दे.’’ त्यांचे हे बोलणे ऐकून मी आणि आई आश्चर्यचकित झालो.
४ इ ७. कु. मधुरा भोसले : पू. तिवारीकाकांमध्ये ‘मनाची बाल्यावस्था आणि बुद्धीची प्रगल्भता असणे’, ही दोन्ही लक्षणे एकत्र पहायला मिळतात. तसेच ‘पैशाचिक’, ‘वानस्पत्य’ आणि ‘मनाची बाल्यावस्था आणि बुद्धीची प्रगल्भता’ या तिन्ही अवस्थांचा सुरेख संगम पू. तिवारीकाकांमध्ये झाल्याचे आढळून येते.
४ इ ८. कु. आरती तिवारी : वरील सूत्र बरोबर आहे. २३.२.२३ या दिवशी झालेल्या भावभेटीत सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांनी पू. बाबांच्या संदर्भात असेच उद्गार काढले होते.
४ इ ७. कु. मधुरा भोसले : त्यांची देहबुद्धी अत्यल्प असल्यामुळे आणि मन पूर्णपणे विश्वमनाशी जोडल्यामुळे त्यांची प्रत्येक कृती ईश्वरेच्छेने होत आहे. त्यामुळे ते ‘अवलिया’ संत आहेत. अवलिया संत ‘मनमौजी’ असतात, म्हणजे त्यांचा स्वभाव लहरी असतो.
४ इ ८. कु. आरती तिवारी : वरील सूत्र बरोबर आहे. २३.२.२३ या दिवशी झालेल्या संतसोहळ्यात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘पू. तिवारीकाका हे अवलिया संत आहेत’, असा त्यांचा उल्लेख केला होता.
(क्रमश: उद्याच्या अंकात)
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.४.२०२३)
|