सावरकर स्मृती पुरस्कार माझा नसून रत्नागिरीकरांचा ! – अधिवक्ता बाबासाहेब परुळेकर
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने सन्मान
रत्नागिरी – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा पुरस्कार वीर सावरकर यांच्या पणतूंच्या उपस्थितीत आणि राज्यपाल यांच्या हस्ते मिळाला, हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा योग अन् सन्मान आहे. रत्नागिरीत काम करतांना सावरकरांच्या स्मृती आणि कार्य जोपासावे अन् प्रसार करण्याचे काम मी आणि माझे सहकारी करत आहोत. त्याची आंतरराष्ट्रीय संस्थेने दखल घेतली, ही अभिमानाची गोष्ट आहे. हा पुरस्कार माझा नसून सर्व रत्नागिरीकरांचा आहे, असे प्रतिपादन अधिवक्ता प्रदीप चंद्रकांत तथा बाबासाहेब परुळेकर यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी असणारी व्यक्ती वा संस्थेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार २०२३ अधिवक्ता बाबा परुळेकर यांना दादरच्या शिवाजी उद्यान येथील सावरकर सभागृहात प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर ते बोलत होते.
या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सहकार्यवाह स्वप्निल सावरकर उपस्थित होते.
या वेळी राज्यपाल रमेश बैस म्हणाले, ‘‘देशाच्या इतिहासात क्रांतीकारक नेत्यांना कलंकित केले गेले. या इतिहासातील अन्यायाला सुधारून सर्व क्रांतीकारकांना योग्य गौरवित करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे समाजाचे शिल्पकार होते, समाजातील दोष दूर करणारे सुधारक होते, जातीभेदाविरोधात लढणारे योद्धे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येणे, हे तीर्थयात्रेसारखे आहे. २८ मे हा दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवदिन म्हणून घोषित केला आहे, तर त्याच दिवशी देहलीत नव्या संसद भवनाच्या वास्तूचे उद्घाटन होणार आहे.’’