सातारा नगर परिषदेच्या वतीने ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ अभियानास प्रारंभ !
सातारा, २१ मे (वार्ता.) – सातारा नगर परिषदेच्या वतीने शहर सीमेत ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ अभियान राबवण्यात येत आहे, अशी माहिती सातारा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून प्रसिद्धीमाध्यमांना दिली. (मराठी भाषेत मोहिमेचे नाव का नाही? – संपादक) या अभियानाच्या अंतर्गत शहरातील सर्व नागरिकांनी उपयोगात आणलेली जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पुन्हा उपयोग करण्यासाठी श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले वाचनालय, मंगळवार तळे, सातारा; श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे उपाख्य दादामहाराज भोसले फळे आणि भाजी केंद्र (मंडई); भवानी पेठ, सातारा अन् अग्नीशमन केंद्र, हुतात्मा स्मारक, सातारा या ठिकाणच्या आर्.आर्.आर्. या केंद्रात जमा कराव्यात. जेणेकरून संकलित केलेल्या निरुपयोगी आणि टाकाऊ वस्तूंपासून नूतनीकरण, पुन्हा उपयोग आणि नवीन उत्पादने सिद्ध करण्यासाठी भागधारकांना, गरजू (नागरिकांना) या वस्तू सुपुर्द करण्यात येतील.