स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया नियमितपणे करून अवघ्या २ वर्षांत स्वतःमध्ये पालट घडवणार्‍या रत्नागिरी येथील सौ. ज्योती मुळ्ये (वय ५० वर्षे) !

सौ. ज्योती मुळ्ये यांचा मुलगा श्री. श्रेयस मुळ्ये हे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत. ‘सौ. ज्योती मुळ्ये यांनी स्वतःमधील स्वभावदोष घालवण्यासाठी कसे प्रयत्न केले ?’, याविषयी श्री. श्रेयस यांना जाणवलेली सूत्रे आणि सौ. ज्योती मुळ्ये यांच्या सहसाधिका सौ. दीपा औंधकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. ज्योती मुळ्ये

१. श्री. श्रेयस मुळ्ये (सौ. ज्योती मुळ्ये यांचा मुलगा), रामनाथी, गोवा.

श्री. श्रेयस मुळ्ये

१ अ. आईने कुटुंबियांकडून अपेक्षा ठेवल्यामुळे घरात सतत वाद होणे : ‘आई माझे वडील, आजी आणि अन्य नातेवाईक यांच्याकडून पुष्कळ अपेक्षा करायची. त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर तिची चिडचिड होत असे. आईमध्ये पुष्कळ ठामपणा असल्यामुळे प्रतिदिन घरात छोटे-मोठे वाद होत असत. त्यामुळे घरात दाब जाणवत असे.

१ आ. आईने साधनेला आरंभ केल्यावर ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया समजून घेऊन स्वभावदोषांचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करणे : वर्ष २०२० पासून माझ्या आईने सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करायला आरंभ केला. तिने व्यष्टी साधनेच्या अंतर्गत ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया (टीप १) समजून घेतली आणि प्रतिदिन सारणी (टीप २) लिखाण करायला आरंभ केला. त्यानंतर स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं न्यून करण्यासाठी ती नियमितपणे प्रतिदिन १२ स्वयंसूचना सत्रे करू लागली. त्याच समवेत तिने प्रतिदिन स्वतःच्या मनाचा आढावा घ्यायला आणि भावजागृतीसाठी प्रयत्न करायला आरंभ केला. मागील २ वर्षांपासून ती असे प्रयत्न सातत्याने करत आहे.

टीप १ : स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या चुका सारणीमध्ये  लिहून ‘तशी चूक पुन्हा होऊ नये’, यासाठी दिवसभरात १० – १२ वेळा मनाला योग्य दृष्टीकोनाच्या सूचना (स्वयंसूचना) देणे

टीप २ : दिवसभरात स्वतःकडून झालेल्या चुका वहीमध्ये लिहून त्या त्या चुकीसमोर योग्य दृष्टीकोन किंवा कृती याविषयी सूचना लिहिणे

१ इ. आईने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया नियमितपणे २ वर्षे केल्यावर तिच्यात सकारात्मक पालट होऊन ‘ती स्थिर झाली आहे’, असे जाणवणे : आईने तिच्या ‘अपेक्षा करणे’ या स्वभावदोषावर चांगले प्रयत्न केले. त्यामुळे काही मासांत तिच्यात पालट जाणवू लागला. तिने आजी किंवा बाबा यांना समजून घेऊन परिस्थिती स्वीकारायला आणि त्यावर उपाययोजना करायला आरंभ केला. त्यामुळे आता ती पुष्कळ स्थिर जाणवते.

तिला घरात घडलेले किंवा सेवेतील काही प्रसंग स्वीकारता येत नाहीत, तेव्हा ती तिच्या उत्तरदायी साधकांशी बोलून घेऊन त्यांनी सांगितल्यानुसार प्रयत्न करते. त्यामुळे आता घरात शांत वाटते आणि घरात गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) अस्तित्व जाणवते.’

२. सौ. दीपा औंधकर, रत्नागिरी

सौ. दीपा औंधकर

२ अ. मनमोकळेपणा : ‘सौ. ज्योतीकाकूंचा स्वभाव मनमोकळा आहे. त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे साधनेच्या आढावा गटातील सर्वांनाच त्यांच्याविषयी जवळीक वाटते. मीही काकूंना माझ्या अडचणी मोकळेपणाने सांगू शकते. त्यांचे दृष्टीकोनही सकारात्मक असतात.

२ आ. नियमितपणा : काकू आढाव्यात नियमित सहभागी होतात. त्यांच्या व्यष्टी साधनेमध्ये पुष्कळ सातत्य आणि नियमितता आहे.

२ इ. शिकण्याची वृत्ती

१. ‘व्यष्टी साधनेच्या आढावा गटातील प्रत्येक साधकाकडून काय शिकायला मिळाले ?’, हे त्या अचूक सांगतात.

२. त्यांना भ्रमणभाषमधील तांत्रिक सेवा शिकण्याची आवड आहे. त्यातील काही गोष्टी शिकण्याचा त्यांनी प्रयत्नही केला आहे.

३. एखादी नवीन गोष्ट त्यांना ठाऊक नसेल, तर त्याविषयी त्या जिज्ञासेने जाणून घेतात.

२ ई. व्यष्टी साधनेच्या संदर्भात विचारून घेणे : ज्योतीकाकूंना व्यष्टी साधनेच्या संदर्भात काही अडचणी आल्या किंवा त्यांच्या मनात काही शंका असतील, तर त्या तत्परतेने उत्तरदायी साधकांना विचारून घेतात.

२ उ. भाव : ज्योतीकाकूंच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती) पुष्कळ भाव आहे. त्यामुळे त्या सतत गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) अनुसंधानात असतात. त्यांचे बोलणे आणि वागणे यांतून प्रत्येक वेळी त्यांच्या मनात गुरुदेवांच्या प्रती असलेला कृतज्ञताभाव जाणवतो.

गुरुदेवा, तुमच्या कृपेने मला ज्योतीकाकूंसारख्या सहसाधिका मिळाल्या. मला त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. ‘त्यांची लवकरात लवकर आध्यात्मिक प्रगती होऊ दे’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

(१६.३.२०२३)