शौर्याचे शिखर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने २१ ते २८ मे या कालावधीत आयोजित केलेला ‘विचार जागरण सप्ताह’
‘जिवंत असतांना एखाद्या माणसाला प्रेताच्या तिरडीवर चढवले, तर काय वाटेल हो त्याला ? स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमानला नेत होते, तेव्हा नेमकी हीच भावना होती त्यांच्या मनात ! जन्मठेपेची कहाणी सांगतांना सावरकर लिहितात, ‘‘आम्ही कैदी कोलकात्याहून निघालो, तेव्हा अनेक जण आम्हाला कायमचा निरोप देत होते. आम्ही परतून येणार नाहीच, याची त्यांना खात्री होती; पण मला मात्र काळजी वेगळ्याच गोष्टीची वाटत होती, मनात मृत्यूची भीती नव्हती; पण मी जो स्वातंत्र्याचा यज्ञ मांडला आहे, तो माझ्या अनुपस्थितीत ‘आम्ही पुढे चालवू’, असे या आलेल्या बघ्यांपैकी कुणीच मला पुढे येऊन का सांगत नाही ? याची खंत होती. एक जण जरी पुढे आला असता आणि म्हणाला असता, ‘जा बंधू जा, तू नसलास, तरी तुझा हा स्वातंत्र्ययज्ञ आम्ही असाच धगधगत ठेवू.’ हे ऐकून मला अंदमानात जातांना आपण जिवंतपणी कुण्या तिरडीवर चढवले जात आहोत, असे वाटले नसते. त्या माणसांच्या आश्वासनाने ती तिरडी राहिली नसती, ती माझ्यासाठी फुलांची शेज झाली असती.’’
१. प्रवासात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दिलेली वागणूक
अंदमानात जीवनाची शाश्वती नव्हती. सावरकर आलेल्या प्रत्येक संकटाला संधी मानत होते स्वतःला अजमावण्याची ! कोलकाता ते अंदमान या प्रवासात सगळे कैदी ज्या भांड्यात संडास करतात, त्याच्या बाजूला सावरकर यांना बसवले. अतिशय घाणेरडा दर्प त्यांच्या नाकात गेला; पण या माणसाने (सावरकर यांनी) विचार केला, हीच आपली संधी अद्वैत वेदांताच्या साधनेची, पराकोटीचे मनस्ताप भोगून अध्यात्माची सर्वोच्च पातळी गाठण्याची !
२. सावरकर यांचा बाणेदारपणा
सावरकर तेलाच्या घाण्याला जुंपलेले असत. ८-८ घंटे तो कोलू फिरवला, तरी जेमतेम २ (९०७ ग्रॅम)-४ (१ किलो ८१४ ग्रॅम) पौंड तेल निघे. बारी जेलर येऊन त्यांच्यावर हसून म्हणत असे, ‘‘तो कैदी पहा. तो तर इतके तेल गाळू शकतो, तुम्हाला तेवढही जमू नये ?’’ सावरकर बारीला जबाब द्यायचे, ‘‘मी अर्ध्या घंट्यात प्रतिभासंपन्न कविता करून देतो ? त्या कैद्याला ४ ओळी लिहिणे तरी जमेल ?’’ सावरकर यांच्या या बाणेदारपणाचा बारीला हेवा वाटायचा.
३. इंग्रजांनी सावरकर यांच्या खच्चीकरणासाठी केलेला प्रयत्न आणि आत्महत्या करू पहाणार्या बंदिवानांना त्यांनी दिलेली उभारी
सावरकर यांच्या कोठडीसमोर फाशीघर होते. एकाच वेळी ३ जणांना फासावर चढवले जात असे. त्यातील काही अट्टल गुन्हेगार असत. त्यांना ओढत, फरफटत आणावे लागे आणि त्यांच्या गळ्याभोवती फास आवळावे लागत. त्यांच्या त्या किंकाळ्यांनी सेल्युलर जेल थरारून जात असे. त्यांची प्रेते सावरकर यांच्या कोठडीसमोर तशीच घंटोन्घंटे पडून रहात. सावरकर यांचे अधिकाधिक मानसिक खच्चीकरण करावे, यासाठी हा खटाटोप. हे असे मृत्यू आपल्या समोर होतांना बघून काय यातना होत असतील ? प्राण पुन: पुन्हा तळमळत नसेल का ? तरीही सावरकर यांचे वेगळेपण बघा. आत्महत्या करायला निघालेल्या आपल्यासारख्या राजबंदीवानांना सावरकर सांगत, ‘‘स्वतःला संपवू नका. आज तुम्ही कष्ट सोसाल; पण पुढे काही वर्षांनी याच कारागृहाबाहेर तुम्हाला आदरांजली म्हणून तुमचे पुतळे उभे रहातील. अंदमान हे क्रांतीचे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनेल.’’ आज सावरकर यांचे शब्द खरे ठरले.
४. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लढाऊ व्यक्तिमत्त्व
अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व हे लढाईला निघालेल्या एखाद्या सेनापतीसारखे होते, असे वाटते. युद्धाला निघालेल्या प्रत्येक सैनिकाच्या भोवती मृत्यू घोंघावत असतोच; पण त्याला चकवून, भुलवून, त्यावर मात करून स्वतः विजय मिळवण्यासाठी लागते अपार धैर्य ! अंगात कमालीची सहनशीलता असावी लागते. त्यांनी अंदमानात कोलू फिरवला, काथ्या कुटला, पाठीवर आसूड झेलले, त्यांना हातापायात साखळदंड अडकवून भिंतीला दिवस दिवस टांगून ठेवत होते. अन्नात साप, गोमांसाचे तुकडे निघत. अंघोळीला खारे पाणी फक्त तीन कटोरे मिळे. रात्री शौचाला अधिकची झाली, तर जाण्याची सोय नव्हती. काय आणि किती सांगावे ? त्यांच्या समवेत सतत अंधार, प्रतिकूलता होती; पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बाज इतका लढाऊ की, हे सगळे सोसत या माणसाने प्रतिभासंपन्न ६ सहस्र काव्यपंक्ती घायपात्याच्या काट्यांनी लिहिल्या कारागृहाच्या भिंतींवर, घेतले कैद्यांचे साक्षरता वर्ग, करून दिली जाणीव राजबंद्यांना त्यांच्या हक्कांची, दिली प्रेरणा अनेकांना जगण्याची !
५. सावरकर मुळातच शूर म्हणून ते ‘स्वातंत्र्यवीर’ !
अत्यंत टोकाची प्रतिकूलता असतांना जगाला अचंबित करील, अशी अनुकूलता सावरकर स्वतःभोवती निर्माण करत होते. अंदमानात त्यांचे व्यक्तिमत्त्व होते संकटांवर स्वार झालेल्या सैनिकाप्रमाणे झुंजार ! त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील या तेजामुळे कल्पनेपल्याडचा चमत्कार त्यांनी करून दाखवला. त्यांनी सेल्युलर कारागृहातील मृत्यूच्या साम्राज्यात जीवनप्रेरणेचे सडे शिंपले. हा माणूसच मुळात शूर होता; म्हणून आज त्याला आपण वीर म्हणून गौरवतो ‘स्वातंत्र्यवीर’ !
– पार्थ बावस्कर
(साभार : फेसबुक)