नवरी मिळेना नवर्याला !
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथील पंकज राजेंद्र महाले हा तरुण १० एकर बागायती भूमीचा मालक आणि उच्च शिक्षित आहे. केवळ शेतकरी असल्याने लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यामुळे याने हताश होऊन डोक्यास मुंडावळ्या बांधून ‘बागायतदार आहे, बागायतदारीण पाहिजे’, असा फलक हातात घेत अनोखे आंदोलन केले. सोलापूर जिल्ह्यात पत्नी मिळत नाही; म्हणून काही तरुणांनी घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एका गावातील सरपंचांनी तर ‘जी कुणी मुलगी शेतकरी युवकाशी विवाह करील, त्या विवाहासाठी आवश्यक ते संसारोपयोगी साहित्य ग्रामपंचायतीच्या वतीने दिले जाईल’, असे विज्ञापन प्रसिद्ध केले आहे. ही वेळ शेतकर्यांवर का आली ? याचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करायला हवा.
वधू मिळायला विलंब झाल्याने अनेक तरुणांचे विवाहयोग्य वय निघून जाते. त्यामुळे नवीनच समस्या उद्भवू लागली आहे. ती म्हणजे विवाह मध्यस्थांची ! अनेक लोक अशा कुटुंबांना ‘तुम्हाला मुलगी शोधून मिळवून देतो’, असे म्हणत मुलगी दाखवतात. त्या कुटुंबाकडून काही लाख रुपये दलाली घेतली जाते आणि विवाह लावून दिला जातो. अशा प्रकरणांत फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. विवाहानंतर काही दिवसांतच या मुली घरातून पैसे, दागिने घेऊन पसार होतात.
‘पारंपरिक व्यवसाय न करता शेतीत नवनवीन प्रयोग करणारा प्रयोगशील शेतकरी पती असावा’, असे आजच्या काही तरुणींना वाटते. अनेक तरुणींना ‘फार्म हाऊस’ (शेतातील निसर्गरम्य वातावरणात बांधलेले घर किंवा बंगला) आवडते; मात्र शेती करणारा तरुण आवडत नाही. तुझे पती काय काम करतात ? असे कुणी विचारल्यास ‘शेती करतात’, असे सांगण्यास मुलींना कमीपणाचे वाटते. वधू पक्षाकडील लोक ‘वराकडे शेती आहे का ?’, असा प्रश्न करतात; मात्र मुलगी त्या शेतीत कष्ट करण्यास सिद्ध नसते. मग शेती हवी कशाला ? असा प्रश्न निर्माण होतो.
या सर्व समस्येवर उपाय म्हणजे सर्वच स्तरावर शेतीप्रधान भारतामध्ये शेतीचे महत्त्व सर्वांवर बिंबवायला हवे. कोरोना महामारीच्या काळात जर पाहिले, तर सर्व प्रकारचे उद्योग बंद पडले; मात्र शेती हा व्यवसाय बंद पडला नाही. त्यामुळे या व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टीने पहाण्याची नितांत आवश्यकता आहे. शेतकर्याने तरी आपल्या मुली शेतकर्याच्या मुलांना देण्याचा विचार करायला हवा !
– श्री. नीलेश पाटील, जळगाव