#Exclusive : १ लाख लोकसंख्येहून अल्प असलेल्या गावांतही सावरकर यांचा परिचय करून द्यायला हवा ! – श्रीकांत ताम्हणकर, सावरकर अभ्यासक, पुणे
२८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या असलेल्या १४० व्या जयंतीनिमित्त विशेष वृत्तमालिका !
शतपैलू सावरकर
भारतमातेच्या मुक्तीयज्ञात स्वतःच्या सर्वस्वाची आहुती देणारे या युगातील महानायक तथा उच्च कोटीचे देशभक्त म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ! सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील अग्रगणी क्रांतीकारक होते. स्वतःला झालेली ५० वर्षांची शिक्षा हसत हसत स्वीकारणे, हा त्यांच्यातील प्रखर राष्ट्रभक्तीचा पुरावा होय ! असे असूनही त्यांच्या पदरी नेहमी उपेक्षाच आली. हिंदुद्रोही काँग्रेसने त्यांच्या उभ्या हयातीत आणि त्यांच्या निधनानंतरही त्यांचा द्वेष केला. ‘सावरकर काय तोलामोलाचे होते ?’, याविषयीचे लिखाण ‘सनातन प्रभात’मधून सातत्याने प्रकाशित करण्यात येते. हिंदुत्वनिष्ठ नियतकालिक म्हणून आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे.
२१ ते २८ मे २०२३ या कालावधीत सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘विचार जागरण सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. यास्तव आम्ही ‘शतपैलू सावरकर’ ही वृत्तमालिका चालू करत आहोत. या माध्यमातून सावरकर यांच्या जीवनप्रवासातील विविधांगी पैलू उलगडण्यास, तसेच युवा पिढीमध्ये जाज्ज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण होण्यास साहाय्य होईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीच्या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’कडून हा छोटासा अभियानरूपी प्रयत्न !
पुणे, २१ मे (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काही काँग्रेसी नेते आणि पुरो(अधो)गामी यांच्याकडून सातत्याने अपसमज पसरवले जातात. त्यांच्यावर आक्षेप घेतले जातात. या आक्षेपांचे सप्रमाण खंडण अनेक सावरकर अभ्यासकांनी करूनही वारंवार तेच तेच आक्षेप घेतले जातात. ‘सावरकरांनी जन्मठेपेच्या काळात ब्रिटिशांना जे ‘पिटीशन्स’ (आवेदन पत्रे) दिली, त्या पत्रांना ‘माफीपत्र’ संबोधणे’, ‘सावरकरांनी द्वीराष्ट्रवाद प्रथम मांडला’ असे म्हणणे, ‘सावरकरांचा गांधीहत्येमध्ये हात होता’, ‘सावरकरांनी ब्रिटिशांना साहाय्य करण्यासाठी सैनिकीकरणाचा पुरस्कार केला’, ‘सावरकर जातीयवादी होते’, ‘सावरकर फॅसिस्ट (कट्टरतावादी) होते’, हे आणि अन्य आक्षेप सावरकरांविषयी घेतले जातात. लोकसभेच्या सभागृहात सावरकरांचे तैलचित्र लावल्यानंतर आणि अंदमानच्या विमानतळाला सावरकरांचे नाव दिल्यानंतर हे आक्षेप जाणीवपूर्वक समाजासमोर मांडले गेले. सध्या युवा पिढी विशेषत्वाने जागृत झाली आहे. त्यांच्याकडून अशा आक्षेपांचे वेळच्या वेळी खंडण केले जात आहे. शहरांमधून स्वा. सावरकर बर्यापैकी परिचित झालेले आहेत, असे वक्तव्य प्रसिद्ध सावरकर अभ्यासक श्री. श्रीकांत ताम्हणकर यांनी केले. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली असता ते बोलत होते.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अनेक अपसमज पसरवले जात आहेत. त्याच्या विरोधात कशा प्रकारे कार्य करायला हवे ?’ या प्रश्नावर बोलतांना श्री. ताम्हणकर पुढे म्हणाले,
‘‘सावरकरांच्या कार्याची माहिती खेडोपाडी, तसेच तळागाळापर्यंत व्हायला हवी होती, ती झालेली नाही. काँग्रेस सरकारच्या काळात शाळा-महाविद्यालये यांतून दिल्या जाणार्या शिक्षणात ‘सावरकर’ कटाक्षाने दुर्लक्षिले गेले. त्यामुळे शालेय शिक्षणातून सावरकरांचा परिचय मुलांना करून दिला पाहिजे. यावर्षी ज्याप्रमाणे ‘हर घर सावरकर’, ‘सावरकर गौरव यात्रा’, ‘विचार जागरण’, ‘सावरकरांविषयी निबंध स्पर्धा’ यांसारखे उपक्रम शहरांतून साजरे केले जात आहेत, तसे कार्यक्रम १ लाख लोकसंख्येहून अल्प असलेल्या गावांमधूनही आयोजित केले जावेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ज्या गावांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य राहिले आहे, त्या गावांमध्ये सहलींचे आयोजन करून विद्यार्थ्यांना ‘सावरकर’ समजून द्यायला हवेत.’’