अमेरिकेत हिंदु रुग्णांची श्रद्धा जाणून घेण्यासाठी डॉक्टरांना करावा लागणार ‘क्रॅश कोर्स’!
(क्रॅश कोर्स म्हणजे अल्प कालावधीचा अभ्यासक्रम)
न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच हिंदु रुग्ण रुग्णालयांच्या खाटेवर प्रार्थना करू शकतील. आपल्या इष्ट देवतेची मूर्ती समवेत ठेवू शकतील. अमेरिकेत प्रथमच अशा प्रकारची अनुमती देण्यात आली आहे. यासह अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या हिंदूंची श्रद्धा चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी डॉक्टरांना ‘क्रॅश कोर्स’ करावा लागणार आहे. त्यासाठी बायडेन सरकारने सर्व रुग्णालयांसाठी पुस्तक सिद्ध केले आहे.
१. हिंदु आई-वडिलांना बाळाच्या जन्मानंतरचे संस्कार करण्यासाठी हातावर ओमकार लिहिणे, सहाव्या दिवशी नवजाताची नाळ पुरणे, उपवास आणि शाकाहार पद्धतींचे पालन करण्याची अनुमती दिली जाणे, असे निर्देशही बायडेन सरकारने रुग्णालयांना दिले आहेत.
२. रुग्णालयात हिंदु महिला रुग्ण पवित्र धागा, कानातील डूल आणि मंगळसूत्र हे सौभाग्यालंकारही परिधान करू शकतील. पुरुष रुग्णांनादेखील धार्मिकदृष्ट्या आवश्यक गोष्टी समवेत बाळगण्याची अनुमती देण्यात आली आहे. अॅलोपॅथिक औषधींसह हिंदु रुग्ण आयुर्वेदाची औषधही घेऊ शकतात. आयुर्वेद भारतीय जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग आहे. त्यासाठी डॉक्टरांनी हिंदु रुग्णांच्या आयुर्वेदविषयक भावना चांगल्या प्रकारे जाणून घेतल्या पाहिजेत, असे बायडेन सरकारकडून सांगण्यात आले आहे.
डॉक्टरांना ‘कर्म सिद्धांत’ ठाऊक असला पाहिजे ! – अमेरिकेच्या मेरीलँड राज्याचे गव्हर्नर वॅस मूर
अमेरिकेच्या मेरीलँड राज्याचे गव्हर्नर वॅस मूर म्हणाले की, कर्म सिद्धांताविषयी हिंदु रुग्णांच्या श्रद्धेविषयी डॉक्टरांना माहिती असली पाहिजे. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्ण हे कोणताही निर्णय अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतील.
मेरीलँड विधानसभेचे सदस्य कुमार बर्वे म्हणाले की, पुस्तकामुळे हिंदु धर्मातील मूल्यांच्या संदर्भात चांगली जाण विकसित होऊ शकते.