तिन्ही मोक्षगुरूंनी परिधान केलेल्या वस्त्रालंकारांचे महत्त्व
१. श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांनी केशरी रंगाचे वस्त्र परिधान करण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव : सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांच्या ठिकाणी साक्षात् श्रीमन्नारायणाचे तेजस्वरूप असणारा सूर्यनारायणच त्याच्या सात पांढर्या अश्वांच्या रथावर आरूढ होऊन भूलोकी अवतरणार होता. त्यामुळे सूर्यनारायणाचे तत्त्व ग्रहण आणि प्रक्षेपित करणारे केशरी किंवा भगव्या रंगाचे वस्त्र सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांनी परिधान केले होते. या वस्त्रातून सूर्यनारायणाचे कोट्यवधी सूर्यकिरण (रश्मी) संपूर्ण ब्रह्मांडात प्रक्षेपित होऊन संपूर्ण ब्रह्मांड दिव्य तेजाने न्हाऊन निघाले होते आणि संपूर्ण सृष्टी दिव्य तेजाने उजळून गेली होती. या सूर्यकिरणांतून आवश्यकतेनुसार साधकांच्या साधनेला साहाय्यक असणारी तारक शक्ती प्रक्षेपित होत असतांना शीतल आणि साधकांचे पाताळातील आसुरी शक्तींपासून रक्षण करण्यासाठी मारक शक्ती प्रक्षेपित होत असतांना उष्ण लहरी वातावरणात कार्यरत झाल्या होत्या.
२. भूदेवीचा अवतार श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी हिरव्या रंगाची साडी परिधान करणे : भूदेवी ही निसर्गसौंदर्याचे प्रतीक असणार्या हिरव्या शालूने सजलेली असते. तिचेच प्रतीरूप असणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी हिरव्या रंगाची साडी परिधान केल्यामुळे त्यांच्यामध्ये श्रीभूदेवीची तारक आणि सृजनात्मक शक्ती कार्यान्वित झाली होती. त्यामुळे भूदेवीच्या माध्यमातून श्रीहरिविष्णु संपूर्ण सृष्टीचे पालन-पोषण करण्याचे दैवी कार्य करत आहे. भूदेवीप्रमाणे गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवलेही विश्वातील समस्त साधकांचा वात्सल्याने आणि निरपेक्ष प्रीतीने प्रतिपाळ अन् रक्षण करत असते.
३. श्रीदेवीचा अवतार श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान करणे : पिवळा रंग ज्ञानाचा आणि संपन्नतेचा आहे. श्रीसूर्यनारायणाकडील चारही वेदांचे ज्ञान श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये सामावले असल्यामुळे त्यांच्या पिवळ्या रंगाच्या साडीतून ज्ञानाचे दिव्य तेज संपूर्ण ब्रह्मांडात प्रक्षेपित झाले. त्यामुळे सात्त्विक जिवांचे ज्ञानचक्षु उघडून त्यांना संपूर्ण ब्रह्मोत्सवातील प्रत्येक क्षण सूक्ष्म आणि दिव्य स्तरावर पहाता अन् अनुभवता आला.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)
|