सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या साधकांनी नृत्यादी सेवांद्वारे श्रीविष्णुची केली भावपूर्ण आराधना !
रथारूढ महाविष्णूची गायन, वादन आणि नृत्य यांद्वारे स्तुती करणे म्हणजेच ब्रह्मोत्सव ! श्रीविष्णुरूपात रथात विराजमान असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांनी कलेच्या माध्यमातून भाव अर्पण केला. नृत्य, गायन आणि वादन सेवा इतकी भावपूर्ण झाली की, त्यामुळे उपस्थित साधकांचाही भाव जागृत झाला ! या संपूर्ण सोहळ्यात लावण्यात आलेल्या सर्व नामधून, भजने सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्यासह अन्य साधकांनी गायलेली होती.
१. सर्वांचा भाव जागृत करणारी नृत्यसेवा !
‘अच्युताष्टकम्’ या श्रीविष्णुस्तुतीपर गीतावर १२ साधिकांनी भावनृत्य सादर केले. या नृत्याच्या वेळी श्रीविष्णूच्या दशावतारातील रूपे दाखवतांनाच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वर्ष २०१८ मध्ये झालेल्या जन्मोत्सवातील शेषशायी श्रीविष्णूरूपही सादर केले. या नृत्याचे संयोजन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या नृत्य अभ्यासिका सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले.
२. भगवंताची स्तुती करणारी गायनसेवा !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सौ. अनघा जोशी (बी.ए. (संगीत), आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी ‘आत्मारामा आनंदरमणा…’ हे गीत सादर केले. त्यांना कु. मयुरी आगावणे, कु. रेणुका कुलकर्णी आणि सौ. भक्ती कुलकर्णी यांनी साथ दिली. या वेळी श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी तबलावादन, श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) यांनी सतारवादन आणि श्री. शैलेश बेहरे यांनी टाळवादन केले.
३. चित्तवृत्ती जागृत करणारी वादनसेवा !
श्री महाविष्णूला आळवण्यासाठी वादनसेवा करतांना श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी सतारीवर ‘पूर्वी’ रागाचे वादन केले. त्यांना श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी तबल्यावर साथ दिली. ‘पूर्वी’ हा सायंकालीन प्रहरातील राग आहे. ब्रह्मोत्सवही त्याच कालावधीत होता.