येणार्या भक्तांची सर्वतोपरी काळजी घेणारे ब्रह्मोत्सव सोहळ्याचे व्यवस्थापन आणि सनातनच्या साधकांनी घडवलेले स्वयंशिस्तीचे दर्शन !
वैशाख मास चालू झाला की, प्रतीक्षा असते श्रीमन्नारायणस्वरूप श्रीगुरूंच्या जन्मोत्सवाची ! यंदा सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव होता ! प्रतिवर्षी हा जन्मोत्सव सोहळा सनातनच्या रामनाथी आश्रमातील चित्रीकरण कक्षात लहान स्वरूपात साजरा होतो. ‘यंदा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांतील सहस्रो साधकांना जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित रहाण्याचे परमभाग्य लाभणार आहे’, हा निरोप जिल्ह्यांत पोचला अन् साधकांचा आनंद गगनाला भिडला ! अनेक जिल्ह्यांतील साधक जन्मोत्सव सोहळ्याला येण्याची सिद्धता करत होते.
मुळात ‘सनातनचे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पार पडतात’, हे केवळ सनातनचे साधकच नाही, तर समाजातील मान्यवर, पोलीस आणि प्रशासन यांनाही ठाऊक आहे. त्यामुळेच या सोहळ्याला जरी अनेक जिल्ह्यांतून सहस्रो साधक उपस्थित रहाणार असले, तरी तो सनातनच्या नेहमीच्याच शिस्तबद्ध पद्धतीने आणि भावपूर्ण वातावरणात पार पडणार, यात शंकाच नव्हती. ब्रह्मोत्सवाला महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आदी राज्यांतील १० सहस्रांहून अधिक साधक आले होते. वाहनतळासह एकूण १३ एकर क्षेत्रात संपूर्ण सोहळ्याची व्यवस्था करण्यात आली होती. साधकांना ब्रह्मोत्सव भावाच्या स्थितीत आणि कोणत्याही अडचणीविना अनुभवता यावा, यासाठी साधकांचे ब्रह्मोत्सवाच्या ठिकाणी उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यात आले होते.
१. भाविकांच्या वाहनांची व्यवस्था !
१. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून १०५ हून अधिक बसगाड्या भरून, तसेच ६०० हून अधिक चारचाकी वाहनांतून साधक ‘ब्रह्मोत्सव’स्थळी आले होते.
२. विविध जिल्ह्यांतून साधक येणार असल्यामुळे त्यांच्या सोयीसाठी कार्यस्थळाच्या १ किलोमीटरपासून थोड्या थोड्या अंतरावर कार्यस्थळाचे दिशादर्शक फलक लावण्यात आले होते.
३. ब्रह्मोत्सवाच्या भव्य सभामंडपाला ४ प्रवेशद्वारे होती. कोणत्या जिल्ह्यातील साधकांनी त्यांचे वाहन कुठे लावावे ? त्यांनी कोणत्या प्रवेशद्वारातून प्रवेश करावा ? कोणत्या जिल्ह्यातील साधकांची बैठकव्यवस्था कुठे आहे ? हे अगोदरच सुनिश्चित करण्यात आले होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने साधक एकत्रित आले असूनही कुठेच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले नाही.
४. साधकांनी सभामंडपात ज्या प्रवेशद्वारातून प्रवेश केला, त्याच प्रवेशद्वारातून साधकांना कार्यक्रमानंतर बाहेर जाण्यास सांगण्यात आले. यामुळे साधकांना कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर घरी जातांना त्यांची वाहने शोधण्यास अडचण झाली नाही.
५. ‘ब्रह्मोत्सवा’साठी आयताकृती मैदानाच्या परिघावर ७६ सहस्र ३२० चौरस फूट मंडपात साधकांसाठी बैठकव्यवस्था केली होती. सभामंडपाच्या मध्यभागी श्रीविष्णुरूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा दिव्य रथ आणि सभोवताली साधकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
६. कार्यस्थळाचा आकार पुष्कळ मोठा असल्यामुळे ब्रह्मोत्सव जवळून पहाता यावा, यासाठी १६ फूट x १२ फूट आकाराचे ४ ‘आऊटडोअर एल्.ई.डी. डिस्प्ले’वर कार्यक्रमाचे प्रक्षेपण चालू होते.
सोहळ्याच्या निमित्ताने सनातनच्या साधकांनी घडवलेले अनुशासन आणि साधकत्व यांचे दर्शन !
सनातन संस्थेचे उत्तरदायी साधक साधकांवर जेवढी भरभरून प्रीती करतात, तेवढीच विविध कार्यपद्धतींच्या माध्यमातून शिस्तही लावतात. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेद्वारेही साधकांना स्वतःला अनुशासनबद्ध जीवन जगण्यास शिकवले जाते. सनातनच्या साधकांच्या या शिस्तीचे, उत्तरदायी साधकांनी सांगितलेल्या सूचनांचे भावपूर्ण आणि तंतोतंत पालन करण्याच्या वृत्तीचे दर्शन या सोहळ्याच्या निमित्ताने घडले. श्रीगुरूंवर श्रद्धा असलेले असे अनुशासनबद्ध साधक हीच सनातनची खरी शक्ती आहे !
१. फर्मागुडी येथून कार्यस्थळी येण्याचा रस्ता अरुंद होता. त्यामुळे वाहनांची रांग लागली होती. तरीही शहरांतील चौकात ‘ट्रॅफिक जाम’ झाल्यावर ज्याप्रमाणे वाहनांचे हॉर्न वाजवले जातात, विलंब होत असल्याबद्दल त्रागा केला जातो, तसे वातावरण नव्हते. सर्व वाहनांतील साधक पुढील वाहने मार्गस्थ होण्याची संयमाने वाट पहात होते.
२. जिल्हानिहाय व्यवस्था असल्यामुळे त्या जवळच्या प्रवेशद्वारातूनच ये-जा करण्याच्या सूचनेचे साधकांनी तंतोतंत पालन केले.
३. सोहळा पार पडल्यानंतर श्रीगुरु विराजमान असलेल्या दिव्य रथाचे दर्शन घेण्यासाठी साधकांना बोलवण्यात आले. तेव्हाही ‘लवकर जिल्ह्यात परत जायचे आहे’, या विचाराने एकच झुंबड न करता ज्याप्रमाणे जिल्ह्यांच्या नावाने उद्घोषणा केली जात होती, त्याच क्रमाने साधक भावपूर्ण दर्शन घेत होते. अशा प्रकारे १० सहस्र साधकांना अल्प कालावधीत रथाचे जवळून दर्शन घेऊन जिल्ह्यांत मार्गस्थ होता आले.
४. जिल्ह्यातून साधक त्यांच्या बसच्या वेळांनुसार काही काळ लवकर कार्यस्थळी पोचले होते. त्या वेळीही मैदानावर रेंगाळून गप्पा-टप्पा, खाऊ खाणे असे न करता सर्व साधक कार्यस्थळी बसून नामजप करणे, तसेच अन्य जिल्ह्यांतील परिचित साधकांशी साधनेविषयी संवाद साधणे, असे करत होते.
एकंदरीतच या सोहळ्याच्या ठिकाणचे एकूणच वातावरण असे होते की, कुणी न सांगताही हा सोहळा ‘सनातन’चा आहे, हे सहज कळून येत होते ! सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी एवढी वर्षे विविध माध्यमांतून साधकांना अनुशासन आणि स्वयंशिस्त यांचे जे महत्त्व सांगितले आहे, ते सर्वत्रच्या साधकांच्या मनावर पूर्णपणे अंकित झाले आहे, हेच या सोहळ्याद्वारे दिसून आले !
– कु. सायली डिंगरे, श्री. सागर निंबाळकर, श्री. अभिजित नाडकर्णी आणि जगदीश इंगोले.
ब्रह्मोत्सवाच्या कार्यस्थळाचे ड्रोनद्वारे टिपलेले विहंगम दृश्य !
सनातनच्या साधकांनी पाहिला… सोनियाचा दिनू… !वर्ष १९९५ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृतमहोत्सव मोठ्या थाटात साजरा केला होता. या महोत्सवाचे अमृतक्षण अनेक साधकांच्या स्मृतीत अजूनही आहेत. या अमृतमहोत्सवाची सिद्धता ८-१० महिन्यांपासून गुरुदेव आणि साधक करत होते. अमृतमहोत्सवापूर्वी महिनाभर साधक दिवस-रात्र सेवा करत होते. वर्ष १९९५ पूर्वी साधनेत आलेल्या साधकांशी साधनेविषयी चर्चा करतांना असे अनेक अमृतक्षण आजही पाझरत असतात. ‘हा सोहळा साधकांना दाखवण्यास कारणीभूत असलेल्या गुरुदेवांचाही असा भव्य जन्मोत्सव साजरा करावा’, अशी सनातनच्या साधकांची मनोमन इच्छा मागील अनेक वर्षांपासून होती, ती या जन्मोत्सवामुळे पूर्णत्वास गेली. प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृतमहोत्सवाच्या वेळी सेवा केलेले अनेक साधक वृद्धावस्थेमुळे आताच्या सोहळ्यात प्रत्यक्ष सेवा करू शकले नाहीत, याची थोडी खंत त्यांना निश्चित वाटली असेल; पण ‘गुरुदेवांचा जन्मोत्सव ‘याची देही, याची डोळा’ पहाण्याचा सोनियाचा दिवस आपल्या जीवनात आला’, याचे कृतकृत्य केवळ या वृद्ध साधकांनाच नव्हे, तर सनातनच्या प्रत्येक साधकाला वाटले असेल’, हे निश्चित ! |
गुरुमाऊलीने दूरदूरच्या ठिकाणांहून आलेल्या साधकांवर घातलेली मायेची पाखर !
वास्तविक शिष्याने गुरूंची सेवा करायची असते. येथे मात्र गुरूंनीच शिष्यांना कशाचीच कमी भासू दिली नाही ! सर्वत्रच्या शिष्यांची मायेच्या ममतेने सर्वतोपरी काळजी घेणारे गुरु आणि श्रीगुरूंच्या एका दर्शनासाठी भर उन्हाळ्यात, वाहनाने १२-१३ घंटे, तर काही जिल्ह्यांतून १८-२० घंटे प्रवास करून येणारे साधक याहून अनमोल उदाहरण कुठे पहायला मिळेल ? – कु. सायली डिंगरे |