श्री शनिदेवाची जयंती केक कापून साजरी करण्याची पाश्चात्त्य कुप्रथा बंद !
‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची विनंती ‘श्री शनैश्चर देवस्थान’कडून मान्य !
शनीशिंगणापूर – श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर येथील ‘श्री शनैश्चर’ या जागृत देवस्थानच्या ठिकाणी मागील ३-४ वर्षांपासून काही भाविक श्री शनिदेवतेची जयंती पाश्चात्त्य पद्धतीने केक कापून साजरा करत होते. वैशाख अमावस्या, म्हणजे १९ मे या दिवशी श्री शनैश्चर जयंतीला या अशास्त्रीय प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या शिष्टमंडळाने श्री शनैश्चर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नितीन शेटे यांची भेट घेऊन हा प्रकार रोखण्याचे आवाहन केले. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही पाश्चात्त्य कुप्रथा बंद केली. महासंघाच्या आवाहनानंतर देवस्थानने तत्परतेने कृती केल्याविषयी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी श्री शनैश्चर देवस्थानचे आभार मानले; तसेच भविष्यात देवस्थानच्या पावित्र्याला कुठलीही बाधा निर्माण होऊ नये या दृष्टीने काळजी घ्यावी, असे आवाहन श्री. घनवट यांनी या वेळी केले.
‘देवतेच्या जन्मदिनी केक कापणे, हे धर्मशास्त्राला धरून नाही. श्री शनैश्चर देवस्थानच्या घटनेतही अशा प्रथेचा उल्लेख नाही. देवस्थानच्या आवारात जयंतीनिमित्त केक कापणारे भविष्यात पाश्चात्यांप्रमाणे नाचगाण्यांचे कार्यक्रमही आयोजित करतील. देवस्थान हे मौजमजा करण्यासाठी नव्हे, तर देवतेची धर्मशास्त्रानुसार उपासना करून आध्यात्मिक लाभ मिळवण्यासाठी आहे. मंदिरे ही धर्माची आधारशीला आहेत. त्यामुळे त्यांचे पावित्र्य अबाधित राखणे, हे प्रत्येक हिंदु भाविकाचे धर्मकर्तव्य आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच देवस्थाने, विश्वस्त मंडळे यांनी मंदिरांच्या परिसरांत असे धर्महानी करणारे प्रकार घडू नयेत याची काळजी घ्यावी’, असे आवाहन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने करण्यात आले.