गोवा : १५ वर्षे जुनी असलेली १ लाख ९२ सहस्र वाहने कालबाह्य ठरणार !
नोंदणीकृत वाहने भंगारात काढण्याविषयी सरकारकडून अधिसूचना जाहीर
पणजी, १९ मे (वार्ता.) – नोंदणीकृत वाहने भंगारात काढण्यासंदर्भातील वर्ष २०२३ च्या धोरणाविषयीची अधिसूचना सरकारने घोषित केली आहे. या अधिसूचनेमध्ये जुनी आणि चालवण्यास सक्षम नसलेली वाहने भंगारात काढण्याविषयीची मागदर्शक तत्त्वे दिली आहेत. जुनी वाहने स्वतःहून भंगारात काढणार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही सवलतीही दिल्या आहेत. वाहनांमुळे होणारे प्रदूषण न्यून करणे, योग्य नसलेली आणि प्रदूषण करणारी वाहने न्यून करून नवीन तंत्रज्ञान असलेली पर्यावरणाला अनुकूल असलेली वाहने खरेदी करण्यास प्रोत्साहन देणे हा सरकारच्या या धोरणामागचा हेतू आहे. हे धोरण आरंभी पुढील ५ वर्षांसाठी लागू केले जाईल.
(सौजन्य : MediaTube)
गोव्यात सध्या १५ वर्षांपेक्षा अधिक काळ जुनी असलेली जवळजवळ १ लाख ९२ सहस्र वाहने असून ती भंगारात काढण्यायोग्य आहेत, तर पुढील ५ वर्षांत राज्यातील जवळजवळ ३ लाख ५० सहस्र वाहनांचा १५ वर्षांचा कालावधी संपून ती भंगारात काढली जातील. भंगारात काढल्या जाणार्या वाहनांमध्ये व्यावसायिक वापरासाठी असलेली वाहने अधिक प्रमाणात आहेत.
नवीन वाहन खरेदी करतांना खासगी वाहनचालकांनी स्वतःहून त्यांची वाहने भंगारात काढण्यासाठी दिली, तर भंगारात काढल्या जाणार्या वाहनावर जो कर असेल, त्यावर २५ टक्के सूट दिली जाईल. तसेच वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्या वाहनांच्या करावर १५ टक्के सूट दिली जाईल. खासगी वाहनांसाठी ही सूट १५ वर्षांच्या कालावधीसाठी, तर व्यावसायिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्या वाहनांसाठी ही सूट ८ वर्षांच्या कालावधीसाठी असेल.