शेतकर्यांना प्रलंबित थकबाकी आणि अनुदान लवकरच संमत करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा
फोंडा येथे कृषी महोत्सवाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
फोंडा – दूध उत्पादक आणि शेतकरी यांची सर्व प्रलंबित थकबाकी अन् प्रोत्साहनपर अनुदान लवकरच संमत करण्यात येईल. कृषी क्षेत्राशी संबंधित अनुदान आता लाभार्थी शेतकर्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जाते. याच धर्तीवर गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांच्याही बँक खात्यात हे प्रोत्साहनपर अनुदान प्रत्येक मासाच्या १५ तारखेपर्यंत थेट जमा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे दिले. फोंडा येथील क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाचे १९ मे या दिवशी उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. दुग्ध व्यावसायिकांना ९ मासांची थकीत देय रक्कम (मालाची खरेदी रक्कम आणि शासनाकडून देण्यात येणारे अनुदान यांतील फरकाची रक्कम) लवकरच देण्यात येईल. गोवा डेअरीच्या कायद्यात पालट करण्याची गरज आहे. गोवा डेअरी ही दूध उत्पादकांची असून त्यांनीच ती चालवायची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Inaugurated the #KrishiMahotsav2023 in the presence of Agriculture Minister Shri @Ravi_S_Naik, Power Minister Shri @SudinDhavalikar and others.
I congratulate the Agriculture Minister and department for organizing the Krishi Mahotsav. I am sure the farmers across the state… pic.twitter.com/cpurMAj01D
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) May 19, 2023
या वेळी कृषीमंत्री रवि नाईक, ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर, फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, कृषी खात्याचे संचालक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की, गोवा शासन राज्यातील शेतकर्यांच्या हितासाठी आणि कृषी उत्पादन वाढवण्यासाठी विविध उपक्रम अन् योजना राबवत आहे. सरकारने गोव्यातील भातशेतीच्या भूमींचे संरक्षण करण्यासाठी कायदा संमत केला आहे. कृषीमित्र हे शेतकर्यांना उत्पादन वाढवण्यासाठी साहाय्य करत आहेत. कृषी महाविद्यालयामुळे, तसेच शासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समन्वय यामुळे राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल. स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न कृषी क्षेत्रात साध्य केले जाईल.
LIVE: Inauguration of Krishi Mahotsav 2023 https://t.co/QPYCcQLY7k
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) May 19, 2023
१९ ते २१ मे २०२३ या कालावधीत हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शासकीय कृषी योजना आणि नवीन अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान यांविषयी शेतकर्यांना माहिती देण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन, सेंद्रिय शेती, पिकाचे मूल्यवर्धन, औषधी वनस्पतींची लागवड, प्रक्रिया आणि पॅकेजिंग तंत्रज्ञान, मार्केटिंग अन् निर्यात सेवा, एकात्मिक कीटक व्यवस्थापन, कृषी यंत्रसामुग्रीची देखभाल, काळा तांदूळ लागवड आणि मधमाशीपालन यांसारख्या शेतीशी संबंधी विविध विषयांवरील माहिती या महोत्सवात देण्यात येत आहे.