सातारा येथे शुद्ध पाण्यासाठी ‘चक्का जाम आंदोलन’ !
(चक्का जाम म्हणजे वाहतूक बंद)
सातारा, १९ मे (वार्ता.) – दीड मासापासून शहरातील पश्चिम भागात दूषित पाण्याचा पुरवठा नगरपालिकेकडून केला जात आहे. वारंवार सांगूनही शुद्ध पाणीपुरवठा केला जात नाही. याच्या निषेधार्थ ढोणे कॉलनी, मनामती चौक, रामाचा गोट परिसरातील नागरिकांनी मोती चौक येथे ‘चक्का जाम आंदोलन’ केले.
या वेळी माजी नगरसेवक रवींद्र ढोणे म्हणाले की, शहरातील पश्चिम भागात गत दीड मासापासून अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आतातर नगरपालिकेकडून गढूळ, गाळमिश्रित, किडे आणि आळ्यामिश्रित पाणी पिण्यासाठी नागरिकांना उपलब्ध करून दिले जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या सर्व टाक्या माझ्या प्रभागात असूनही आम्हाला शुद्ध आणि पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. आता आमच्या सहनशीलतेचा अंत झाला असून, जर आम्हाला १ घंटा, पूर्ण दाबाने शुद्ध पाणी मिळाले नाही, तर यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. या वेळी पोलिसांनी नगरपालिकेतील अधिकार्यांना पाचारण केले. नगरपालिकेतील पाणीपुरवठा अधिकारी वाठारे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शुद्ध पाण्याची मागणी करावी लागणे लज्जास्पद ! – संपादक)