महिला अत्याचारांशी संबंधित तक्रारींमध्ये १४० टक्क्यांनी वाढ !
महिलांना सुरक्षितता प्रदान करणारे हिंदु राष्ट्र स्थापण्याची आवश्यकता यातून अधोरेखित होते !
गेल्या ४ वर्षांत हुंडाबळीची एकही तक्रार नाही !
नागपूर – माहितीच्या अधिकाराखाली (आर्.टी.आय.) मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ५ वर्षांत महिला अत्याचार गुन्ह्यांशी संबंधित तक्रारींमध्ये तब्बल १४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्र महिला आयोगाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, वर्ष २०१७-१८ मध्ये एकूण ६ सहस्र ६५९ तक्रारी प्रलंबित होत्या, तर वर्ष २०२२-२३ मध्ये त्या १६ सहस्र १२ पर्यंत वाढल्या आहे, अशी माहिती ‘द यंग व्हिसलब्लोअर्स फाऊंडेशन’चे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दिली आहे.
१. महिलांवरील गुन्ह्यांच्या पालटत्या स्वरूपाची माहितीही यातून स्पष्ट होते. कामाच्या ठिकाणी महिलांच्या छळाच्या घटनांमध्ये १३९ टक्के वाढ झाली असून वर्ष २०१७-१८ मध्ये ३९६ प्रकरणे होती, ती वर्ष २०२२-२३ मध्ये ९५० झाली आहेत. गेल्या ४ वर्षांत हुंडाबळीची एकही तक्रार प्रविष्ट झालेली नाही, तर वर्ष २०१७-१८ मध्ये अशा ३५ तक्रारी प्रलंबित होत्या.
२. सामाजिक अत्याचार आणि बलात्काराशी संबंधित तक्रारींमध्ये २१७ टक्क्यांनी भरीव वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
३. वर्ष २०१७-१८ मध्ये कारवाईसाठी प्रलंबित प्रकरणांची संख्या १ सहस्र ४०५ होती, तर वर्ष २०२२-२३ मध्ये ती ४ सहस्र ४६२ वर गेली आहे.
४. सार्वजनिक व्यासपिठावर किंवा सामाजिक माध्यमांच्या संकेतस्थळांवर महिलांविषयी अवमानास्पद टिपणी केल्याविषयी नोटीस बजावलेल्या वलयांकित आणि सार्वजनिक व्यक्तींवरील कारवाईविषयी आयोगाने कोणतीही माहिती दिलेली नाही.