स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या १४० व्‍या जयंतीच्‍या निमित्ताने २१ ते २८ मे या कालावधीत ‘विचार जागरण सप्‍ताहा’चे आयोजन !

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (संग्रहित चित्र)

सांगली – स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या १४० व्‍या जयंतीच्‍या निमित्ताने पर्यटन संचालनालय महाराष्‍ट्र शासन आणि विवेक व्‍यासपीठ यांच्‍या वतीने २१ ते २८ मे या कालावधीत सांगली येथे ‘विचार जागरण सप्‍ताहा’चे (वीरभूमी परिक्रमा) आयोजन करण्‍यात आले आहे. २१ मे या दिवशी सकाळी ७ वाजता विश्रामबाग येथून पर्यावरणपूरक फेरीने प्रारंभ होईल. सायंकाळी ६ वाजता क्रांतीवीर बाबाराव सावरकर स्‍मारक येथे ‘स्‍वतंत्रते भगवते’ हा लहान मुलांचा गाण्‍यांचा कार्यक्रम होईल. २२ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजता ‘स्‍वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा त्‍या तिघी’ हा कार्यक्रम भावे नाट्यगृह येथे, २३ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजता ‘उत्‍सव तेजाचा स्‍वातंत्र्यविरांचा’ हा कार्यक्रम स्‍वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्‍ठान मैदान येथे होत आहे.

कार्यक्रमाच्‍या निमित्ताने काढण्‍यात आलेली पत्रिका

२४ मे या दिवशी मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृह येथे सायंकाळी ६ वाजता ‘कृतज्ञ मी ! कृतार्थ मी’ नाटक, २५ मे या दिवशी भावे नाट्यगृह, सांगली येथे सायंकाळी ६ वाजता ‘अनादि मी अनंत मी’ याचे कलात्‍मक सादरीकरण, २६ मे या दिवशी मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृह येथे सायंकाळी ६ वाजता ‘माझी जन्‍मठेप’ (नाट्याविष्‍कार) याचे सादरीकरण, २७ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजता राष्‍ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांचे क्रांतीवीर बाबाराव सावरकर स्‍मारक येथे कीर्तन, तर २८ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजता भावे नाट्यगृह येथे सुप्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण यांचा ‘मी विनायक दामोदर सावरकर’ यावर नाट्यप्रयोग होणार आहे.

या सर्व कार्यक्रमांत राष्‍ट्रीय विचारधारेतील सांगली जिल्‍ह्यातील अनेक संस्‍थांनी उत्‍स्‍फूर्तपणे सहभाग घेतला आहे, तसेच अनेक सावरकरप्रेमी उपस्‍थित रहाणार आहेत, तरी या विचार जागरणाच्‍या कार्यात आणि सर्व अभिनव उपक्रमांत आपण सर्वांनी सक्रीय सहभागी व्‍हावे, असे आवाहन विवेक व्‍यासपीठ आणि क्रांतीवीर बाबाराव सावरकर स्‍मारक समिती यांनी केले आहे.