भेडशी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्रीमती सुहासिनी टोपले (वय ७२ वर्षे) या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त !
दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) – पतीच्या निधनानंतर खचून न जाता प्रतिकूल परिस्थितीत मुले आणि घर सांभाळण्यासह व्यष्टी-समष्टी साधना नियमित करणार्या, साधकांमध्ये गुरुमाऊलीचे रूप पहाणार्या भेडशी येथील सनातनच्या साधिका श्रीमती सुहासिनी सुधाकर टोपले उपाख्य टोपलेभाभी (वय ७२ वर्षे) या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याचे सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी १६ मे या दिवशी घोषित केले. ही आनंदवार्ता ऐकून उपस्थित साधकांचा भावजागृत झाला आणि सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली.
भेडशी येथील साधक श्री. साईनाथ डुबळे यांच्या निवासस्थानी १६ मे या दिवशी झालेल्या सत्संगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवात आलेल्या अनुभूती साधकांनी कथन केल्या. त्याच वेळी सद्गुरु सत्यवान कदम यांनी ‘प्रतिकूल परिस्थितीतही श्रीमती टोपलेकाकू यांच्या साधनेत सातत्य असते. त्या नियमितपणे साधनेचा आढावा देतात. त्यांच्या तळमळीमुळे गुरुदेवांनी त्यांची जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटका केली असून त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे’, असे घोषित केले. या वेळी सद्गुरु सत्यवान कदम यांनी श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन श्रीमती टोपले यांचा सत्कार केला.
माझे प्रारब्ध मला भोगून संपवायचे आहे, या विचारामुळे परिस्थितीला सामोरी जाऊ शकले ! – श्रीमती सुहासिनी टोपले यांनी व्यक्त केलेले मनोगत‘घरात प्रतिकूल परिस्थिती आहे. जी परिस्थिती निर्माण होईल, ती स्वीकारायची आणि कुणी काही बोलले, तर ते ऐकायचे, शांत रहायचे आणि नामजपाकडे लक्ष द्यायचे. जीवनात घडणारे प्रसंग आणि निर्माण होणारी परिस्थिती हे सर्व माझे प्रारब्ध आहे. ते मला भोगून संपवायचे आहे, हा विचार मनात असतो. सर्व परिस्थितीला परमपूज्यांच्या कृपेमुळे सामोरी जाऊ शकले. यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’ |
श्रीमती टोपले यांच्याविषयी सद्गुरु आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे
१. सद्गुरु सत्यवान कदम, कुडाळ
१ अ. श्रीमती टोपलेकाकू यांच्याशी बोलल्यावर आनंद जाणवणे : ‘श्रीमती टोपलेकाकू यांची कौटुंबिक परिस्थिती प्रतिकूल असतांनाही त्या नेहमी स्थिर असतात. त्यांच्याकडे पाहून, तसेच त्यांच्याशी बोलल्यावर आनंद जाणवतो.
१ आ. अंतर्मुखता : त्या नेहमी अंतर्मुख असतात. त्या बोलतांना नेहमी ‘सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण करण्यासाठी कुठे न्यून पडत आहे’, याविषयी आवर्जून सांगतात.
१ इ. त्या सेवेतील अडचणी सांगून त्या सोडवण्यासाठी इतर साधकांचे साहाय्य घेतात. त्यांना कोणतीही सेवा सांगितल्यास त्या सकारात्मक असतात.
१ ई. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव : त्यांची प्रत्येक कृती आणि विचार यांतून प.पू. गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉक्टरांप्रती) भाव व्यक्त होतो.’
२. श्री. सुनील नांगरे, भेडशी
२ अ. यजमानांच्या निधनानंतर खचून न जाता एका अपंग मुलासह ३ मुलांचा सांभाळ करणे : ‘वर्ष १९९० मध्ये टोपलेकाकूंच्या यजमानांचे निधन झाले, तरीही त्यांनी खचून न जाता ३ मुलांचा सांभाळ केला. त्यांचा मोठा मुलगा श्री. सुशांत (वय ५० वर्षे) हा विकलांग आहे. टोपलेकाकू त्याची सुश्रूषा करतात.
२ आ. समष्टी सेवा आणि कर्तव्य पार पाडत असतांना व्यष्टी साधनाही करणे : त्या साधकांकडून मासिक अर्पण गोळा करणे, तसेच भेडशी येथे येणारा दैनिक ‘सनातन प्रभात’चा गठ्ठा आणून तो वितरकापर्यंत पोचवणे, साधकांना भ्रमणभाष करून सत्संगाची आठवण करून देणे, या सेवा करत असतांना त्या व्यष्टी साधनेचा आढावाही नियमित देतात.
२ इ. तत्त्वनिष्ठतेने चुका सांगून साधकांना साधनेत साहाय्य करणे : फलकावर लिहायचे लिखाण ‘व्हॉट्सॲप’ने येते. त्यांच्या भ्रमणभाषवर ती सुविधा नसल्याने त्या ते लिखाण एका साधकाला कागदावर लिहून आणायला सांगतात आणि नंतर त्या फलकावर लिहितात. कधी लिखाण वेळेत आणले गेले नाही, तर त्या साधकाला त्याची चूक सांगून ती सुधारण्यास सांगतात. फलक लिखाणाच्या सेवेतून त्यांना पुष्कळ आनंद मिळतो.’ (१३.४.२०२३)
श्रीमती सुहासिनी टोपलेकाकू यांच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना१. श्रीमती शुभांगी मणेरकर : ‘मला १५ दिवसांपूर्वीच ‘श्रीमती टोपलेभाभी यांची आध्यात्मिक उन्नती होईल’, असे वाटले होते.’ २. श्री. संदीप सोमवंशी : ‘श्रीमती टोपले ज्या पद्धतीने साधना आणि सेवा करत आहेत. त्यामुळे त्यांची लवकर प्रगती होईल’, असा विचार मी एका साधकाकडे व्यक्त केला होता.’ ३. श्री. मोहन देशमुख : ‘श्रीमती टोपले यांची आध्यात्मिक पातळी घोषित होण्याच्या आदल्या दिवशी आम्ही साधक चर्चा करत होतो की, भेडशीतून कुणाची तरी प्रगती व्हायला हवी आणि त्याचे उत्तर लगेच मिळाले.’ |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |