मुंबई पोलीस भरतीत बटण कॅमेर्‍याचा वापर करून ब्‍ल्‍यूटूथद्वारे शेकडो जणांनी लिहिली उत्तरे !

एका उमेदवाराकडून १० लाख रुपये घेतले !

प्रतिकात्मक छायाचित्र

बीड – मुंबई पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर अपप्रकार झाल्‍याचे समोर आले आहे. उमेदवारांनी बटण कॅमेर्‍याच्‍या साहाय्‍याने प्रश्‍नपत्रिकांची छायाचित्रे काढून ती ई-मेलद्वारे बाहेर पाठवली आणि बाहेर असलेल्‍या शिक्षकांनी त्‍यांना मायक्रो ब्‍ल्‍यूटूथद्वारे उत्तरे सांगितली. शेकडो जणांनी अशा प्रकारे परीक्षा दिली. एका उमेदवाराकडून १० लाख रुपये घेण्‍यात आल्‍याचा दावा स्‍पर्धा परीक्षा समन्‍वय समितीचे अध्‍यक्ष राहुल कवठेकर यांनी केला आहे. कवठेकर यांनी तब्‍बल १६ प्रकारच्‍या प्रश्‍नपत्रिकांची छायाचित्रे मुंबई पोलिसांना पुरावा म्‍हणून दिली आहेत. भांडुप पोलिसांनी कवठेकर यांचा १८ मे या दिवशी जबाब नोंदवला आहे. विशेष अन्‍वेषण पथकाकडून (एस्.आय.टी.कडून) भरती प्रक्रियेतील या अपप्रकाराची चौकशी व्‍हावी, अशी मागणी समितीने केली आहे.

मुंबई पोलीसदलात रिक्‍त ७ सहस्र ७८ जागांसाठी ७ मे या दिवशी लेखी परीक्षा पार पडली. एकूण २१३ केंद्रांवरून ७८ सहस्र ५२२ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. भरती प्रक्रियेत उच्‍च दर्जाच्‍या पद्धतीचा वापर करून अपप्रकार केला जाणार असल्‍याची कुणकुण स्‍पर्धा परीक्षा समन्‍वय समितीला लागली होती. (या परीक्षेत घोटाळा होणार असल्‍याचे स्‍पर्धा परीक्षा समन्‍वय समितीला समजते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांच्‍या गुप्‍तचर यंत्रणेला याची माहिती कशी मिळाली नाही ? या गुप्‍तचर यंत्रणेतील पोलीस कर्मचारी झोपले होते का ? या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि उमेदवार यांचीही चौकशी झाली पाहिजे. – संपादक) समितीचे अध्‍यक्ष राहुल कवठेकर यांनी ५ मे या दिवशीच याविषयी मुंबई पोलिसांना माहिती दिली होती.

यानंतर पोलिसांनी केलेल्‍या पडताळणीत काही जण अशा प्रकारे कॉपी करतांना आढळून आले होते. यात कस्‍तुरबा मार्ग पोलीस ठाणे, गोरेगाव पोलीस ठाणे, मेघवाडी पोलीस ठाणे आणि भांडूप पोलीस ठाण्‍यात स्‍वतंत्र गुन्‍हे नोंदवले आहेत. १७ मे या दिवशी मुंबई पोलीसदलातील भरतीसाठीची अंतरिम गुणवत्ता सूची घोषित झालेली आहे; मात्र समितीने मुंबई येथील पोलीस उपायुक्‍त पुरुषोत्तम कराड यांचीही भेट घेऊन या प्रकरणी माहिती दिली आहे.

संपादकीय भूमिका

पोलीसदलाच्‍या भरती प्रक्रियेत असा अपप्रकार होणे, हे पोलीसदलाला लज्‍जास्‍पद आहे. पोलीसदलाच्‍या भरती प्रक्रियेतच अशा प्रकारे भ्रष्‍ट पद्धतीने कारभार होत असेल, तर निवडून आलेले भ्रष्‍ट उमेदवार हे पारदर्शी कारभार कसे करतील ?