मातेचे धर्माचरण – युवा पिढीचे अनुकरण !
असे म्हटले जाते की, आईची शिकवण मुलांचे भवितव्य घडवते. लहान मूल हे अनुकरणप्रिय असल्याने ते आपल्या आई-वडिलांचे अनुकरण करण्यास लवकर शिकते. त्यामुळे आई-वडीलांना समाजात वावरतांना सामाजिक आणि नैतिक सतर्कता ही बाळगावीच लागते. नुकतेच लालबाग येथे मातृदिनाच्या निमित्ताने एका संघटनेच्या विद्यार्थीनींनी स्वत:च्या आईला समोर बसवून तिचे चित्र रेखाटले. सध्या पोशाखावर ओढणी न घेण्याची फॅशन रूढ झाली आहे. या फॅशननुसार चित्र रेखाटून घेणार्या मातांनीही पोशाखावर (पंजाबी पोशाख) ओढणी घेतलेली नव्हती. वरकरणी या प्रसंगात ‘मातांनी पोशाखावर न घेतलेली ओढणी’ ही गोष्ट अत्यंत क्षुल्लक वाटत असली, तरी त्याचा परिणाम समाजमनावर होत असतो, हे निश्चित. प्रत्येकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे, हे खरे असले तरी स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार बळावला, तर त्याचे दुष्परिणाम पुढील पिढीला भोगावे लागतात. सध्या महिलांवरील वाढते अत्याचार हे स्त्रियांनी धर्माचरण न करण्याचेच दूषित फळ आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे; म्हणून समाजात मुली-महिला यांवरील वाढते अत्याचार न्यून झालेले नाहीत, हे सत्य नाकारता येणार नाही. सध्याची आधुनिक स्त्री काळ, वेळ, सर्व बंधने यांतून मुक्त होऊ पहात असल्याने पोशाखांवर ओढणी घेणे तिला लाजिरवाणे वाटू लागले आहे. ‘ओढणी घेणे, या बंधनशील कृतीमुळे वासनांधांच्या वाईट नजरेपासून समस्त स्त्रियांचे रक्षण होणार आहे’, हा यामागील व्यापक दृष्टीकोन समजून घेतल्यास ते बंधन वाटणार नाही, तर स्त्रीच्या शालीनतेचे ते प्रतिक आहे, हे लक्षात येईल.
खरे तर स्त्री ही भगवंताने निर्मिलेली सर्वाेत्कृष्ट कलाकृती आहे. तिच्यातील सद्गुणांनीच ती भारतीय संस्कृतीचे रक्षण करू शकते. पूर्वीच्या काळच्या अहिल्या, द्रौपदी, तारा, मंदोदरी, सीता, गार्गी, मैत्रेयी या स्त्रियांनी कर्तव्यनिष्ठेसह भारतीय संस्कृतीचे जतन केले आहे. राजमाता जिजाबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांसारख्या योद्धा स्त्रियांनीही पुष्कळ अधिकार आहेत; म्हणून धर्माचरण करणे सोडले नाही. म्हणूनच त्यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. आज जगातील सर्व राष्ट्रांतील स्त्रिया कुतूहलाने आणि आशेने भारतीय ‘स्त्री’कडे पहात आहेत. त्यामुळे स्त्रियांनी श्रेष्ठतम हिंदु संस्कृतीचा अभिमान बाळगून धर्माचरण करण्याचा निर्धार करायला हवा ! – श्रीमती वर्षा कुलकर्णी, सोलापूर