‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण – हलाल जिहाद ?’, या ग्रंथाचे तेलुगु भाषेत भाषांतर करण्यासाठी गुरुकृपेने एका वाचकाचे साहाय्य लाभून गुरूंनीच ती सेवा करून घेतल्याविषयी अनुभूती येणे
१. ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण – हलाल जिहाद ?’, हा ग्रंथ तेलुगु भाषेमध्ये प्रसिद्ध व्हावा’, असे वाटणे; पण ग्रंथाच्या भाषांतरासाठी कुणीही न मिळणे
‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण – हलाल जिहाद ?’, हा ग्रंथ तेलुगु भाषेमध्ये प्रसिद्ध व्हायला पाहिजे’, असे मला वाटत होते. ‘या ग्रंथामुळे प्रसार अधिक चांगला होईल’, असे वाटून ‘कुठल्याही परिस्थितीत हा ग्रंथ त्वरित प्रसिद्ध व्हायला हवा’, अशी मला तीव्र तळमळ लागली; परंतु ग्रंथाचे भाषांतर करण्यासाठी कुणीही उपलब्ध नव्हते. शेवटी माझे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शरण जाऊन मी स्वतःच भाषांतर करायला आरंभ केला.
२. भाषांतराची सेवा करतांना ‘साक्षात् गुरुदेव भाषांतर करत आहेत’, असे जाणवून आनंद मिळणे
मी दिवसभर अध्यात्मप्रसाराची सेवा केल्यानंतर रात्री १२ वाजल्यापासून २ वाजेपर्यंत ग्रंथाचे भाषांतर करण्याची सेवा करत होतो. तेव्हा ही सेवा माझ्याकडून अत्यंत सहजपणे होत होती. मला भाषांतरासाठी आपोआपच वाक्ये सुचत होती. ‘साक्षात् गुरुदेव भाषांतर करत असून मी ते पहात आहे’, अशी मी अनुभूती घेत होतो. ही सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळत होता.
३. गुरुकृपेने समितीच्या संकेतस्थळाच्या एका वाचकाने ग्रंथाचे भाषांतर करण्यासाठी साहाय्य करणे
मी ४ – ५ दिवस भाषांतराची सेवा तळमळीने करत होतो. समितीच्या संकेतस्थळाचे एक वाचक आहेत. ते नेहमी मला पत्रकार परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकाचे भाषांतर करून देतात. त्यांनी मला भ्रमणभाष करून विचारले, ‘‘भाषांतरासाठी काही ग्रंथ आहेत का ? मला सेवा करण्याची इच्छा आहे.’’ ते ऐकून माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘आपल्या मनात गुरुकार्य करण्याची थोडी जरी तळमळ असेल, तर ‘गुरुदेव कशी कृपा करतात ?’, हे मला अनुभवता आले.
४. भाषांतराची सेवा करतांना वाचकांना पुष्कळ अडथळे येणे आणि ते दूर होण्यासाठी गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर १५ दिवसांत भाषांतर सेवा पूर्ण होणे
या ग्रंथाचे भाषांतर करतांना भाषांतर करू इच्छिणार्या त्या वाचकांना पुष्कळ अडचणी येत होत्या, म्हणजे ‘मध्येच त्यांचे स्वास्थ्य बिघडणे किंवा व्यावहारिक अडचणी येणे’, असे होत होते. तेव्हा ‘अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळेच या सेवेत अडचणी येत आहेत’, हे आमच्या (माझ्या आणि त्या वाचकाच्या) लक्षात आले. आम्ही या सेवेत येणारे अडथळे दूर होण्यासाठी गुरुदेवांना शरणागतीने प्रार्थना करत होतो. त्यानंतर त्यांनी १५ दिवसांत त्या ग्रंथाचे भाषांतर पूर्ण करून दिले.
आता ते वाचक दुसर्या एका ग्रंथाचे भाषांतर करण्याची सेवा करत आहेत. आपल्यामध्ये गुरुकार्य करण्याची तळमळ असेल, तर देव कुणाकडूनही काहीही करून घेऊ शकतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे साक्षात् नारायण आहेत. ते अंतर्यामी आहेत. ते सर्व जाणतात आणि कार्य करून नामानिराळे रहातात. मी त्यांच्या आणि श्रीकृष्णाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. चेतन गाडी, तेलंगाणा (२३.४.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |