‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत गांधी मैदानात भव्य सभा ! – राजेश क्षीरसागर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २८ मे या दिवशी कोल्हापूर दौर्यावर
कोल्हापूर – राज्यशासनाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला व्हावा यासाठी ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची’, हा उपक्रम चालू केला आहे. या अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून २८ मे या दिवशी महात्मा गांधी मैदानात सायंकाळी ५ वाजता भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे प्रमुख पदाधिकार्यांच्या प्राथमिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.
श्री. राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘शासनाच्या विविध योजना गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यापर्यंत पोचाव्यात, हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या कामी कोल्हापूर जिल्ह्यात शिवदूतांच्या नेमणुकीचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिवदूत आणि शासन यांच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोचवल्या जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून ७५ सहस्रांपेक्षा अधिक नागरिकांना या अभियानातून लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे.’’
या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, समन्वयक जयवंत हारूगले, उत्तर शहरप्रमुख रणजीत जाधव, दक्षिण शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख प्रा. शिवाजीराव पाटील, किशोर घाटगे यांसह अन्य उपस्थित होते.