सनातन धर्माच्या रक्षणासाठी ‘माला’ (जपमाळ) आणि ‘भाला’ दोघांची आवश्यकता ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री
पाटलीपुत्र (बिहार) – भगवान हनुमान हे शास्त्राचे, तर अगंद शस्त्राचे प्रतीक आहेत. सनातन धर्मामध्ये शास्त्र आणि शस्त्र या दोघांची आवश्यकता आहे. शास्त्र आणि शस्त्र यांच्यात अधिक अंतर नाही. केवळ एक काना काढला, तर शास्त्राचे शस्त्र बनतेे. सनातन धर्माच्या रक्षणासाठी ‘माला’ (जपमाळ) आणि ‘भाला’ या दोघांची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथील त्यांच्या हनुमंत कथेच्या समारोपाच्या वेळी उपस्थित लाखो भाविकांना केले. ५ दिवसांच्या त्यांच्या या कथेचा समारोप झाल्यानंतर ते पुन्हा बागेश्वर धामकडे मार्गस्थ झाले. पाटलीपुत्र येथे त्यांच्या भित्तीपत्रांवर काळी शाई फासण्यात आल्याच्या घटनेवर, ‘भित्तीपत्रके फाडली जाऊ शकतात; मात्र तुम्ही लोकांच्या हृयातून कसे काढाल ?’, असा प्रश्न त्यांनी विचारला.