सातारा शहरातील पश्चिम भागात किडे आणि अळ्यामिश्रित पाणीपुरवठा !
सातारा, १८ मे (वार्ता.) – शहराच्या पश्चिम भागात गत ३ मासांपासून कधी गाळमिश्रित, तर कधी किडे, अळ्यामिश्रित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. १५ मे या दिवशी नागरिकांनी पश्चिम भागातील माजी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली सातारा नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले, तसेच पालिका प्रशासनाला निवेदनही दिले. (नागरिकांना असे आंदोलन का करावे लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ? – संपादक)
या वेळी पश्चिम भागातील नगरसेवक सर्वश्री रवींद्र भैय्या ढोणे, विजयकुमार काटवटे, राजू गोरे, माजी नगराध्यक्ष तथा विरोधी पक्ष नेते अशोक मोने, माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी माजी नगरसेवक आणि नागरिक यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, ‘पॉवर हाऊस’ येथील ‘फिल्टर बेड’ची स्वच्छता होऊनही पश्चिम भागात कचरामिश्रित, किडे आणि आळ्यामिश्रित पाणीपुरवठा होत आहे. पालिका प्रशासनाला वारंवार तोंडी आणि लेखी तक्रारी देऊनही यात पालट झालेला नाही. येत्या ४ दिवसांत शहरातील पश्चिम भागातील पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा संपूर्ण सातारा शहराला पाणीपुरवठा करणारी ‘पॉवर हाऊस’ येथील टाकी आम्ही बंद करून संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा थांबवू.