फोंडा (गोवा) येथील सौ. मनाली भाटकर यांना नामजप करतांना आलेल्या अनुभूती
१. ध्यानमंदिरात नामजपाला बसल्यावर भक्तीसत्संगात सांगितलेली भावार्चना करतांना गुरुदेवांच्या चरणांतील चैतन्य बोटांतून शरिरात जाऊन संपूर्ण देह चैतन्यमय होत असल्याचे जाणवणे : ‘८.२.२०२३ या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपाला बसले होते. तेव्हा नामजपाला आरंभ करण्यापूर्वी मी भक्तीसत्संगात सांगितलेली भावार्चना केली. मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ‘सच्चिदानंद परब्रह्म’, असा नामजप ५ वेळा केला. त्या वेळी मी गुरुदेवांच्या चरणांचे स्मरण करत त्यांच्या चरणांवरून हळूवारपणे हात फिरवत होते. तेव्हा ‘त्यांच्या चरणांतील चैतन्य माझ्या बोटांतून माझ्या शरिरात जात आहे आणि माझा देह पूर्णपणे चैतन्यमय होत आहे’, असे मला वाटत होते.
२. ध्यानमंदिरात पांढरा प्रकाश पसरल्याचे जाणवणे, तो गुरुदेवांच्या छायाचित्रातून येत असल्याचे लक्षात येणे आणि प्रकाशाने डोळे दिपल्यावर गुरुदेवांना प्रार्थना केल्यानंतर तो प्रकाश बघता येणे : काही वेळाने ‘ध्यानमंदिरात पुष्कळ पांढरा प्रकाश पसरला आहे’, असे मला जाणवले. तेव्हा ‘ध्यानमंदिरात कुणीतरी दिवे लावले असतील’, असे मला वाटले; परंतु नंतर माझ्या लक्षात आले, ‘हा प्रकाश गुरुदेवांच्या छायाचित्रातून येत आहे.’ तेव्हा मी तो प्रकाश डोळे उघडून बघण्याचा प्रयत्न करत होते; परंतु माझे डोळे त्या प्रकाशाने दिपून गेले. त्यामुळे मला डोळे उघडता येत नव्हते. नंतर मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींना प्रार्थना केली आणि मला तो प्रकाश डोळे उघडून पहाता आला.
‘हे सर्व मला गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाने अनुभवता आले’, त्याबद्दल मी त्यांच्या दिव्य चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. मनाली भाटकर, फोंडा, गोवा. (४.३.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |