गोवंशियांच्या हत्या करणार्यांवर कारवाई न झाल्यास संपूर्ण तालुक्यात आंदोलन करणार !
मंडणगड तालुक्यात झालेल्या गोवंशियांच्या हत्येच्या विरोधात संतप्त हिंदूंची मूकमोर्च्याद्वारे चेतावणी
खेड, १८ मे (वार्ता.) – मंडणगड तालुक्यातील कादवण आणि वलवते या २ गावांच्या सीमारेषेवर ९ मे या दिवशी झालेल्या गोवंशियांच्या हत्येच्या विरोधात संतप्त हिंदूंकडून १७ मे २०२३ या दिवशी मूकमोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा सकाळी ११ वाजता डॉ. आंबेडकर हायस्कूल ते तहसीलदार कार्यालय असा काढण्यात आला. या वेळी प्रशासनाला ‘गोवंशियांच्या हत्या करणार्यांवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण तालुक्यात याविषयी आंदोलन उभारू’, अशी चेतावणी एका निवेदनाद्वारे देण्यात आली. हे निवेदन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी विजय सूर्यवंशी यांना देण्यात आले. (गोवंशियांच्या हत्या रोखण्यासाठी तत्परतेने कृती करणारे असे हिंदु बांधव सर्वत्र हवेत ! – संपादक )
या मोर्च्यात कादवण, वलवते, लाटवण, भोळवली पंचक्रोशीतील गावांमधील १०० हून अधिक हिंदू सहभागी झाले होते. भर उन्हातून हा मोर्चा मंडणगड तहसीलदार कार्यालयावर धडकला. मोर्च्याच्या शेवटी कादवण गावचे सरपंच श्री. राजेंद्र सोंडकर, श्री. संतोष सोनू गोवळे, भोळवली येथील विविध सहकारी सोसायटीचे अध्यक्ष श्री. संतोष राणे, तसेच ग्रामस्थ श्री. पांडुरंग माने यांनी त्यांचे विचार व्यक्त केले.
‘समाजकंटकांवर योग्य ती कारवाई होऊन वारंवार होणारे गोहत्येचे प्रकार थांबवावेत. काही जण परत परत गुन्हे करतात. हत्या केलेल्या गोवंशियांचे अवयव नदीमध्ये टाकतात. जेथे असे प्रकार घडतात, अशा संवेदनशील ठिकाणी ‘सीसीटिव्ही कॅमेरे’ बसवावेत. या मूकमोर्च्याने योग्य उपाय मिळेल, अशी अपेक्षा हिंदू बाळगून आहेत. समाजाचा उद्रेक होण्यापूर्वी समाजकंटकांचा योग्य तो बंदोबस्त करावा. यावर कारवाई न झाल्यास तालुकास्तरीय भव्य आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी या मोर्च्याच्या माध्यमातून प्रशासनाला देण्यात आली.
प्रशासनाचे नेहमीचेच उत्तर !
या वेळी मोर्च्यातील शिष्टमंडळ, तहसीलदार सूर्यवंशी आणि पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी चर्चा केली. तहसीलदार सूर्यवंशी यांनी ‘प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत, सकारात्मकरित्या या घटनेचा उलगडा होण्यासाठी प्रयत्न होत आहेत’, असे सांगितले. तसेच पोलीस उपनिरीक्षक जाधव म्हणाले की, ही समस्या संपवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितरित्या प्रयत्न करत आहोत. सर्व बाजूंनी अन्वेषण चालू असून या संवेदनशील सूत्राला वेगळे वळण लागण्यापूर्वी एकत्रितरित्या या गोष्टी कशा सुटतील ? हे आपण पाहू. सगळ्यांचे सहकार्य चांगले मिळत असून याहीपुढे सहकार्य चांगले मिळेल.
संपादकीय भूमिका
|