गोव्यात १० उद्योगांना गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची मान्यता

३४८ कोटी रुपयांची गुंतवणूक : ३ सहस्र ५०० युवकांना नोकर्‍या मिळणार !

एकूण ३४८ कोटी रुपयांच्या १० उद्योगांना मान्यता

पणजी, १७ मे (वार्ता.) – गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या ३३ व्या बैठकीत एकूण ३४८ कोटी रुपयांच्या १० उद्योगांना मान्यता मिळाली आहे. याद्वारे ३ सहस्र ५०० युवक आणि युवती यांना रोजगार मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. उद्योगमंत्री मावीन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

ते पुढे म्हणाले,

‘‘गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची आता प्रत्येक मासाला बैठक घेतली जाणार आहे. मंडळाने १० उद्योगांना मान्यता दिली आहे. यामधील ४ उद्योग हे सध्या कार्यरत असलेल्या उद्योगांचे त्याच ठिकाणी विस्तारीकरण करण्याचे प्रकल्प आहेत.

गोव्यात सध्या कार्यरत असलेल्या काही उद्योगांचे ३ नवीन प्रकल्प, संरक्षण क्षेत्रासाठी बॅटरीवर चालणारे ‘ए.टी.व्ही’ आणि ‘यु.टी.व्ही.’ सिद्ध करण्याच्या उद्योगक्षेत्रात कार्यरत असलेले गोवास्थित ‘स्टार्टअप’, अन्न चाचणी प्रयोगशाळा आणि एक पर्यावरण पर्यटन प्रकल्प यांचा प्रत्येकी १ प्रकल्प यांचा यामध्ये समावेश आहे.’’