सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीजपुरवठ्याची समस्या गंभीर !
अल्प दाबाच्या पुरवठ्यामुळे आर्थिक हानी
मालवण – सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस वीजपुरवठ्यात सातत्याने पालट होत असून कधी अल्प, तर कधी उच्च दाबाचा वीजपुरवठा होत आहे. सातत्याने पालटणार्या या विजेच्या दाबामुळे विजेच्या उपकरणांची हानी होत आहे, तसेच पर्यटनाचा हंगाम चालू असल्याने पर्यटकांना चांगल्या सुविधा पुरवणे व्यावसायिकांना कठीण होत आहे. त्यामुळे या समस्येकडे महावितरण आस्थापनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.
वीजपुरवठा सुरळीत करण्याची शिवसेनेची मागणी
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरि खोबरेकर यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात खोबरेकर यांनी म्हटले आहे की, सातत्याने पालटणार्या वीजपुरवठ्यामुळे आर्थिक हानीला सामोरे जावे लागत आहे. मालवण शहर आणि ग्रामीण भागात वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे पर्यटन व्यावसायिक आणि नागरिक यांना त्रास होत असून अनेकांची आर्थिक हानी होत आहे. शहर, तसेच ग्रामीण भागात येणार्या पर्यटकांना अल्प दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे चांगल्या सुविधा देता येत नाहीत. तसेच वातानुकूल यंत्र (एसी), पंखे, अन्य विजेची उपकरणे जळल्याने हानी होत आहे. त्यामुळे महावितरणने पावसाळ्यापूर्वी वीजपुरवठा सुरळीत करावा.