मातृभाषेचा सन्मान हवाच !
‘औद्योगिक’ क्षेत्रामध्ये काम करतांना, स्थानिक ‘मातृभाषे’च्या असलेल्या प्रभावामुळे, तसेच अनुक्रमे त्या पद्धतीने बोलल्यामुळे अनेक तरुणांना ‘बहुराष्ट्रीय’ (एम्.एन्.सी.) आस्थापनांमध्ये नोकरी नाकारल्याच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये आस्थापने कारण देतांना सांगतात की, त्यांचे ‘क्लायंट’ (ग्राहक) हे अमेरिका किंवा इतर देशांचे आहेत. एखाद्यामध्ये कौशल्य नाही; म्हणून नोकरी नाकारली तर वेगळी गोष्ट आहे. कौशल्य आहे; पण बोलण्याची पद्धत वेगळी आहे; म्हणून एखाद्याला नोकरी नाकारणे, हे कारण पचनी पडणारे नाही.
त्यानंतर एखादी व्यक्ती इतर जिल्ह्यांमधून नोकरीच्या किंवा शिक्षणाच्या निमित्ताने दुसर्या जिल्ह्यात आली, तर त्याची भाषा पालटते, अशा वेळेस त्यांची टिंगल उडवली जाते. त्याला न्यून लेखण्याचा भाग होतो. यामुळे त्या व्यक्तीला परकेपणाची जाणीव होऊन एकटे पडल्यासारखे वाटते. भारत हा ‘विविधतेतून एकतेने’ नटलेला देश आहे. येथे प्रत्येक ५०-१०० कि.मी.वर भाषा पालटते. असे असतांना भाषा हे एखाद्याच्या ‘प्रतिभे’चे लक्षण कसे असू शकते ?
प्रत्येकाची भाषा आणि संस्कृती यांचा आपण आदर करायला शिकले पाहिजे. विदेशी आस्थापने या इंग्रजी भाषेवर आग्रही असतील, तर भारतासमवेत व्यवहार करतांना आपण त्यांना आपली राष्ट्रभाषा ‘हिंदी’ यांवर व्यवहार करण्यासाठी आग्रही असले पाहिजे. ‘भाषा’ ही राष्ट्राला जोडण्याचे काम करते. त्यामुळे आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान असलाच पाहिजे. यांसाठी आपण चीन, जपान, कोरिया यांचे उदाहरण घेऊ शकतो. ते लोक इंग्रजी या भाषेला फारसे महत्त्व देत नाहीत. याउलट ते स्वभाषेचा सार्थ अभिमान बाळगतात आणि अधिकाधिक व्यवहार हे त्यांच्याच भाषेतून करतांना दिसतात. जो भाषेचा त्रास आपल्याला झाला, तो आपल्या पाल्याला होऊ नये; म्हणून बरेचसे पालक आवश्यकता नसतांनाही घरात इंग्रजी बोलतात. मराठीत बोलायला काहींना लाज वाटते. त्यांना वाटते आपण सर्वांसमोर आपल्या मातृभाषेत बोललो, तर लोक आपल्याला अशिक्षित समजतील. त्या भीतीपोटी बरेच जण तोडके-मोडके का होईना; पण इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करतात.
मातृभाषेसह इतर भाषा अवगत करणे, हाही ज्ञानार्जनाचाच एक भाग आहे; पण स्वभाषा, स्वसंस्कृती यांची अवहेलना करून इतर संस्कृतीच्या अधीन जाणे, म्हणजे स्वतःचे अस्तित्व गमावल्यासारखे होत नाही का ? याचा विचारही प्रत्येकाने करायला हवा !
– श्री. जयेश बोरसे, पुणे