अंघोळ करूनच का अन्न शिजवावे ?
सध्या अनेक घरांमध्ये सर्रासपणे विचारला जाणारा हा प्रश्न आहे. त्यावर ‘स्वयंपाक करून घाम येतो; म्हणून आम्ही जेवण बनवून मगच अंघोळ करतो, अशी विविध कारणे सांगितली जातात. असे कुठे लिहिले आहे ? अंघोळ करूनच अन्न का शिजवावे याचे कारण काय ?
१. आपण जेवतो ते अन्न जठराग्नीत ‘वैश्वानर’ आहुती रूपात ग्रहण होणे
आपल्या जठरात जो वैश्वानर नावाचा अग्नी आहे, जो प्रत्यक्ष नारायणाचेच एक रूप आहे. (भगवद़्गीतेत ‘अहं वैश्वानरो भूत्वा’, असा जो श्लोक आहे, त्यात भगवान योगेश्वर कृष्णाने ‘आपला निवास जठराग्नीत ‘वैश्वानर’ रूपात आहे’, असे म्हटले आहे.) आपण जेवतो ते अन्न, या वैश्वानर अग्नीमध्ये आहुती रूपात जाते. भोजन करण्यापूर्वी आपण ‘वदनी कवळ घेता’, हा श्लोक म्हणतो. त्यात शेवटचे चरण ‘जाणिजे यज्ञकर्म’ असे म्हटले आहे, ते याच उद्देशाने !
२. यज्ञयागाचा नियम जठराग्नीसाठी लागू असणे
आता जर आपल्या घरी एखादा यज्ञयाग करायचा असेल, तर आपण त्या यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी जे अन्न (भात, पायस वगैरे) शिजवू ते स्नान करूनच शिजवू; कारण ते देवतांना समर्पण करायचे असते. तसेच आपल्या पोटात जठरात जो अग्निनारायण आहे, त्याला अन्नाची आहुती देतांनाही हाच नियम लागू पडतो.
३. भोजनापूर्वी शुचिर्भूत होण्यामागील कारण
आपण अथवा आपले पुरोहित, गुरुजी यज्ञामध्ये आहुती देतांना कधी चप्पल घालून बसलेले पाहिले आहेत का ? नाही ना; कारण त्या आहुत्या देवतांना अर्पण करायच्या असतात. तसेच आपल्या शरिरातील अग्निनारायणाला आहुती देतांनाही (भोजन करतांनाही) हाच नियम लागू होतो. म्हणून भोजनापूर्वी चप्पल काढून, हातपाय धुऊन आणि चूळ भरून शुचिर्भूतपणे आसनावर शांतपणे बसून भोजन करावे.
४. आचरण शुद्धीचे महत्त्व
आचार आणि विचार ही दोन्हीही धर्माची महत्त्वाची अंगे आहेत. आचार आणि विचार हे दोन्ही शुद्ध असतील, तर निश्चितच कल्याण होईल, यात संशय नाही. एकाच ताटामध्ये सर्वजण उष्टे खरकटे विचार न करता खातात. यामुळे सर्वसामान्यांची बुद्धी १०० टक्के भ्रष्ट होते. हिंदु धर्मात आचरण शुद्धीला महत्त्व याकरता आहे.
‘जर तुमचा श्रीकृष्णावर विश्वास आहे, तर मग ते आपल्या शरिरात आहेतच’, ही खात्री बाळगा आणि ‘आपण जे अन्न भक्षण करतो, ते त्यांनाच समर्पण करतो’, अशी भावना ठेवा. मग ६ मासांत विचार, बुद्धी आणि आचरण यांमध्ये चांगला आमूलाग्र पालट घडतो कि नाही ? ते पहा.
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग. (१५.५.२०२३)