पहिले मराठी प्राध्‍यापक बाळशास्‍त्री जांभेकर !

आज ‘दर्पण’कार बाळशास्‍त्री जांभेकर यांचा स्‍मृतीदिन आहे. त्‍या निमित्ताने विनम्र अभिवादन !

ज्‍या वेळी आपला देश इंग्रजांच्‍या गुलामगिरीत होता, त्‍या वेळी देशात शाळा आणि महाविद्यालये दुर्मिळच होती. त्‍यातल्‍या त्‍यात इंग्रजी महाविद्यालयांमध्‍ये मराठी प्राध्‍यापक असणे, ही त्‍याहून दुर्मिळ गोष्‍ट ! परंतु इंग्रजांच्‍या काळात एका मराठी माणसाने मुंबईतील आणि कदाचित् संपूर्ण देशातील पहिले मराठी प्राध्‍यापक होण्‍याचा मान मिळवला होता. इतकेच नाही, तर त्‍यांना देशातील मराठी वृत्तपत्रांचे जनक म्‍हणूनही ओळखले जाते. या अद्वितीय व्‍यक्‍तीमत्त्वाचे नाव आहे ‘बाळशास्‍त्री जांभेकर !’

मुंबई प्रांताचे पहिले गव्‍हर्नर लॉर्ड एल्‍फिन्‍स्‍टन यांच्‍या निवृत्तीनंतर त्‍यांच्‍या स्‍मरणार्थ वर्ष १८३४ मध्‍ये मुंबईत एल्‍फिन्‍स्‍टन महाविद्यालयाची स्‍थापना झाली. या महाविद्यालयात बाळशास्‍त्री जांभेकर यांची प्राध्‍यापक म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात आली. एल्‍फिन्‍स्‍टन महाविद्यालयातील ते पहिले मराठी प्राध्‍यापक होते. या महाविद्यालयात ते गणित, भौतिकशास्‍त्र आणि खगोलशास्‍त्र हे विषय शिकवत. मुख्‍य म्‍हणजे याच महाविद्यालयात शिकणारे दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे समाजसुधारक बाळशास्‍त्रींचे विद्यार्थी होते. (संदर्भ : अज्ञात)