नाशिक येथे लावणी नृत्यागंना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात तरुणांचा गोंधळ !
तरुणांच्या मारहाणीत २ पत्रकार घायाळ !
नाशिक – शहरातील नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णवाहिकेसाठी निधी जमवण्यासाठी लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम त्र्यंबक रस्त्यावरील ठक्कर डोम येथे १६ मे या दिवशी आयोजित करण्यात आला होता; या कार्यक्रमात वाद आणि गोंधळ यांची परिस्थिती तशीच राहिली. कार्यक्रमातील उपस्थित तरुणांनी हुल्लडबाजी करून २ पत्रकारांना मारहाण केल्याने सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. येथे झालेल्या गोंधळाप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे.
यापूर्वी निफाड तालुक्यातही कार्यक्रमात गोंधळ झाला होता. या वेळी २ पत्रकार व्यासपिठाजवळ जाताच तरुणांनी पत्रकारांना व्यासपिठावरून पाय धरून खाली ओढून मारहाण केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली, तसेच कॅमेर्याचीही हानी झाली. या वेळी बंदोबस्तास असलेले पोलीस गोंधळाच्या ठिकाणी नव्हते. त्यानंतर गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी सौम्य लाठीमार केला.