संजय राऊत हिंदु नाहीत, त्यांची ‘एस्.आय.टी.’द्वारे चौकशी करा !
आचार्य तुषार भोसले यांची मागणी
नाशिक – त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर धूप दाखवण्याची परंपरा १०० वर्षांपूर्वीची आहे, हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सिद्ध करावे. संजय राऊत हे हिंदु नाहीत. त्यांनी असे वक्तव्य केल्याविषयी हिंदु समाजाची क्षमा मागावी, तसेच त्यांची विशेष अन्वेषण पथकाद्वारे (‘एस्.आय.टी’)द्वारे चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी १७ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केली.
तुषार भोसले म्हणाले की, सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी धूप दाखवण्याची परंपरा १०० वर्षे जुनी असल्याचे म्हटल्याविषयी त्यांनी सकल हिंदु समाजाची क्षमा मागावी. याच पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरीमध्ये येऊन पुरोहितांशी चर्चा केली. पुरोहित वर्गाकडे शेकडो वर्षांचा इतिहास लिहिलेला आहे; पण याची कुठेही याची नोंद नाही. मंदिर व्यवस्थापन मंदिराच्या विश्वस्तांशी चर्चा केली. यावरून संदलची मंदिराला धूप दाखवण्याची कोणतीही प्रथा परंपरा त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामध्ये नाही. मग संजय राऊत यांना ही परंपरा असल्याचा साक्षात्कार कधी आणि कसा झाला ?’’
ते म्हणाले की, आम्ही अनेक दिवसांपासून सांगत होतो की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी हिंदुत्व सोडले असून संजय राऊत यांनी तर हिंदु धर्मही सोडल्याच्या भूमिकेवर आता शिक्कामोर्तबच झाले आहे. राऊत यांनी हिंदु समाजाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा. एस्.आय.टी. याची चौकशी करेल; पण २ समाजांत तेढ निर्माण करण्यात त्यांनी हातभार लावलेला आहे. या प्रकरणामुळे त्याच्यातून निश्चितच दंगली भडकू शकतात, यासाठी त्यांची चौकशी केली जावी. राऊत यांच्याकडे संदल संदर्भात कोणती अधिकची माहिती आहे ? अन्यथा २ समाजांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा नोंदवावा. जर ४८ घंट्यांच्या आत हिंदु धर्मियांची क्षमा मागितली नाही, तर ४८ घंट्यांनंतर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी चेतावणीही त्यांनी या वेळी दिली.