धुळे-मनमाड-दादर एक्सप्रेसला आणखी ४ डबे जोडणार !
रेल्वे प्रशासनाचा निर्णय !
मनमाड – मध्य रेल्वेने मनमाडहून दादर येथे जाणारी प्रतिगोदावरी एक्सप्रेस आठवड्यातून ३ दिवस धुळे येथून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील प्रामुख्याने मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड आदी भागांतील दैनंदिन चाकरमानी, व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थी यांच्या मागण्या लक्षात घेऊन आता या गाडीस आणखी ४ नवीन डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले, तरी प्रवासी अप्रसन्नच आहेत.
प्रवाशांच्या अन्य मागण्यांकडे दुर्लक्ष
धुळे-दादर गाडीला ४ डबे वाढवण्याचा निर्णय १८ मेपासून लागू होत आहे. मनमाडमधून सहस्रो प्रवासी नाशिक आणि मुंबई येथे ये-जा करतात. ‘या गाडीतील २ डबे मनमाडसाठी आरक्षित ठेवावेत’, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. पूर्वीची मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस ही पूर्ववत् चालू करावी किंवा पर्यायी गोदावरी म्हणून चालू करण्यात आलेली मनमाड-दादर एक्सप्रेस ही आठवड्यातील सर्व दिवशी मनमाडहून सोडण्यात यावी, या मागणीकडे मात्र रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे मनमाड-नाशिक-दादर प्रतिदिन प्रवास करणारे प्रवासी संतप्त आहेत.
कोरोना संसर्गाचे कारण देऊन २ वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची हक्काची, तसेच जागा मिळणारी आणि वेळेवर सुटणारी मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस बंद केली. ती पूर्ववत् झालेली नाही. ती नियमित चालू झाल्याविना उत्तर महाराष्ट्रांतील दैनंदिन प्रवाशांना दिलासा मिळणार नाही. – सुशांत राजगिरे, नियमित रेल्वे प्रवासी |