सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त नृत्यकलेशी संबंधित साधिकेला नृत्य करतांना आलेल्या अनुभूती
२२.५.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव झाला. या जन्मोत्सवाच्या वेळी निघालेल्या दिंडीत विविध नृत्ये सादर करण्यात आली. या नृत्यांत नृत्यकलेशी संबंधित साधिका सहभागी होत्या. जन्मोत्सवानिमित्त झालेल्या दिंडीत या नृत्याच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. नृत्यापूर्वी आलेल्या अनुभूती
१ अ. जन्मोत्सवासाठी नृत्य बसवण्याचा निरोप मिळाल्यावर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होऊन ‘तुम्हाला अपेक्षित असे नृत्य बसवून घ्या’, अशी प्रार्थना होणे : ‘प्रतिदिन नृत्याचा सराव करतांना मला ‘कुठल्यातरी गाण्यावर नृत्य बसवूया’, असे वाटत होते. हे विचार मनात आल्यावर काही दिवसांनी ‘जन्मोत्सवासाठी नृत्य बसवायचे आहे’, असा निरोप मिळाला. तेव्हा गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कृतज्ञता व्यक्त झाली आणि प्रार्थना झाली की, ‘हे गुरुदेवा, आपणच हे नृत्य आपल्याला अपेक्षित असे बसवून घ्या. आमच्या मनाला आपल्या चरणी अर्पण करून भावपूर्ण असे प्रयत्न आपणच करवून घ्या.’
१ आ. प्रत्येक वेळी आई नृत्याची पूर्वसिद्धता करवून घेत असल्याचा विचार मनात आल्यावर गुरुदेवांनी अन्य साधिकेतील गुण आणि नवीन सूत्रे शिकायला मिळणार असल्याचे सांगणे अन् प्रत्यक्षातही साधिकेकडून शिकतांना आनंद मिळणे : या आधी आई किंवा ताई माझे नृत्य बसवायच्या; पण ‘आता अन्य साधिका नृत्य बसवणार आहेत’, असा विचार माझ्या मनात आल्यावर तो मी गुरुदेवांना आत्मनिवेदन केला. त्या वेळी गुरुदेवांनी सूक्ष्मातून असे विचार सुचवले की, ‘आधी तू केवळ ताई आणि आई यांच्याकडूनच नृत्य बसवून घ्यायची. आता त्या साधिकेकडून नृत्य बसवून घेतांना तुला तिच्यातील गुण आणि अनेक नवीन सूत्रे शिकायला मिळणार आहेत.’ प्रत्यक्षात त्या ताईकडून नृत्य बसवून घेतांना मला नृत्यातील काही बारकावे शिकायला मिळाले आणि पुष्कळ आनंदसुद्धा मिळाला.
२. सराव करतांना आलेल्या अनुभूती
२ अ. नृत्य सरावाच्या कालावधीत सूक्ष्मातून ‘श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवच नृत्य करवून घेत आहेत’, असा भाव ठेवल्याने नवीन नृत्यमुद्रा सुचणे : संपूर्ण नृत्य बसवतांना आणि त्याचा सराव करतांना ‘सूक्ष्मातून श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवच तिथे येऊन सराव करून घेत आहेत’, असे जाणवत होते. जेव्हा आम्हाला काही नृत्यमुद्रा (स्टेप्स) सुचत नव्हत्या, त्या वेळी प्रार्थना केल्यावर कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), मला किंवा सौ. सावित्रीताईला (सौ. सावित्री इचलकरंजीकर यांना) अनायास नृत्यमुद्रा सुचायच्या आणि त्या गाण्याच्या बोलांवरसुद्धा सहज करता येत होत्या.
२ आ. ‘जय जनार्दना…’, या गाण्याच्या एका नृत्यमुद्रेमध्ये स्वतःसमवेत ‘प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे’, असे जाणवून श्रीकृष्णाच्या डोळ्यांत पाहिल्यावर ‘डोळ्यांतून चैतन्य, कृपा अन् प्रीती प्रक्षेपित होत आहे’, असेे जाणवणे : ‘जय जनार्दना…’, या गाण्यावर नृत्याचा सराव करतांना एका नृत्यमुद्रेमध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची एक भावमुद्रा दाखवायची होती. त्यात अपालाने श्रीकृष्णाची आणि मी अर्जुनाची मुद्रा केली. हे करत असतांना ‘तिथे अपाला नसून श्रीकृष्ण आला आहे’, असे जाणवत होते. श्रीकृष्णाचे रूप अनुभवतांना त्याच्या डोळ्यांकडे बघितल्यावर ‘डोळ्यांमधून चैतन्य, कृपा आणि प्रीती प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवत होते. मी अर्जुन असल्याने ‘मला त्याच स्थितीत श्रीकृष्णाच्या चरणांजवळ शिष्यभावात बसून रहावे’, असे वाटत होते.
२ इ. नृत्याचे सराव सलग झाल्यामुळे शारीरिक त्रास होत होते; पण सराव करतांना काहीच त्रास जाणवत नव्हते. नृत्याचा सराव करतांना ‘प्रत्येक क्षणाला किती अनुभवू !’, असे वाटत होते.
२ ई. प्रतिदिन सराव करतांना सहसाधकांकडून पुष्कळ नवीन सूत्रे शिकायला मिळाली, तसेच प्रत्येक क्षणी आनंदाची स्थिती अनुभवता आली.
‘हे श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवा, आपणच हे नृत्य बसवून घेतले. आपण करून घेतलेल्या नृत्याचा सराव आणि सेवा आपल्या चरणी एका फुलाप्रमाणे अर्पण करता येऊ द्या. माझा देह, मन आणि बुद्धी यांना आपल्या चरणी अर्पण होता येऊ द्या. तुम्ही आमची काही पात्रता नसतांनाही ‘न भूतो न भविष्यति ।’ म्हणजे ‘पूर्वी कधी झाले नाही आणि भविष्यातही होणार नाही’, अशा दैवी रथोत्सवात सेवा करण्याची संधी दिली आणि या संपूर्ण कालावधीमध्ये साधकांच्या, तसेच विविध प्रसंगांच्या माध्यमातून पुष्कळ काही शिकवले आहे. गुरुदेवा, या कृपेसाठी आणि करुणेसाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), नृत्य अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा (२५.५.२०२२)
|