हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर एस्.टी. बसस्थानक अभियानाला प्रारंभ
वर्षभर चालणार्या अभियानासाठी २ कोटी रुपयांची पारितोषिके घोषित !
रत्नागिरी – १ मे या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर एस्.टी. बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री, तथा म.रा.मा.परिवहन महामंडळाचे अध्यक्ष शिंदे यांनी एस्.टी. महामंडळाच्या ३०२ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत एस्.टी.ची सर्व बसस्थानके, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर आणि प्रवासी बसेस स्वच्छ आणि टापटीप असाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भात स्पर्धात्मक स्वरूपात अभियान राबवून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात यावे, असे निर्देश दिले. त्यानुसार स्पर्धा घोषित करण्यात आली असून यासाठी २ कोटींहून अधिक रुपयांच्या रकमेची पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.
या अभियानचा कालावधी एक वर्षाचा आहे. सध्या राज्यभरात एस्.टी महामंडळाची ५८० पेक्षा अधिक बसस्थानके आहेत. या स्पर्धेसाठी या सर्व बसस्थानकांची ‘अ’ वर्ग (शहरी), ‘ब’ वर्ग (निमशहरी) आणि ‘क’ वर्ग (ग्रामीण) असे वर्गीकरण करण्यात आले आहे. राज्यभरात एस्.टी महामंडळाचे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर असे ६ प्रादेशिक विभाग आहेत. त्यांच्याकरता ही स्पर्धा २ टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये प्रदेशनिहाय अ, ब आणि क वर्गासाठी स्पर्धा घेण्यात येतील. दुसर्या टप्प्यामध्ये प्रत्येक प्रदेशातून प्रत्येक गटामध्ये प्रथम आलेल्या बसस्थानकांसाठी राज्यस्तरावर अंतिम स्पर्धा होईल. अंतिम स्पर्धेमध्ये पहिला येणार्या बसस्थानकांना गटनिहाय ५० लाख, २५ लाख आणि १० लाख रुपयांचे पारितोषिक, चषक आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी परीक्षण समित्या नेमण्यात येणार असून प्रति २ मासांनी प्रत्येक बसस्थानकाचे स्पर्धात्मक परीक्षण करण्यात येणार आहे. वर्षभरातील प्रति २ मासांनी होणार्या परीक्षणाच्या सरासरीद्वारे स्पर्धेचा अंतिम विजेता ठरणार आहे. स्पर्धेमध्ये बसस्थानक आणि बसस्थानकाचा परिसर, बसस्थानकावरील स्वच्छतागृहे, प्रवासी बसेस यांच्या स्वच्छतेसमवेतच सुशोभीकरण आणि टापटीप यासाठी अधिकाधिक गुण दिले जाणार आहेत. यासमवेतच या अभियानामध्ये कर्मचार्यांची आरोग्य तपासणी, त्यांचे प्रवाशांसमवेत सौहार्दपूर्ण वागणे, उत्पन्नवाढीसाठी केलेले प्रयत्न, बसेसचा वक्तशीरपणा या घटकांनादेखील गुणात्मकरित्या विशेष महत्त्व देण्यात येणार आहे. शक्यतो या संकल्पनेच्या आधारे या अभियानातील अधिकाधिक कामे लोकसहभागातून करावीत.
त्यासाठी आवश्यक निधीची उभारणी विविध स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, प्रवासी संघटना, महिला बचतगट, तरुण मंडळे यांनी दिलेल्या देणगीच्या माध्यमातून तसेच वेगवेगळ्या घटकांनी केलेल्या श्रमदानातून करावे, असे सूचित करण्यात आले आहे. त्याला अधिक गुण प्राप्त होणार आहेत.