अतिरेक टाळा !
भ्रमणभाषवर छोटे ‘रिल्स’ (काही सेकंदांचे व्हिडिओ) किंवा ‘व्लॉग’ (व्हिडिओद्वारे सांगण्यात येणारी माहिती) करण्याचे वेड पुष्कळ वाढलेले आहे. काही जण हे व्हिडिओ घरात बनवतात, तर काही जण आपापल्या कामाच्या ठिकाणी करतात किंवा काही जण मित्र-मैत्रिणींसमवेत ते सिद्ध करतात. प्रत्येक रिल्सचे विषय वेगवेगळे असतात. त्यांपैकी काही व्हिडिओ हे खरोखर प्रबोधनात्मक आणि म्हणूनच कौतुकास्पदही असतात; पण काहींची निर्मिती केवळ मनोरंजन म्हणून केलेली असते. काही जणांकडून राष्ट्र, धर्म, समाज, भाषा, तसेच सद्गुण, संस्कार यांच्याशी संबंधित हितावह गोष्टी त्यात दाखवलेल्या असतात. त्यातून योग्य दिशा मिळू शकते; पण केवळ मनोरंजन म्हणून केल्या जाणार्या व्हिडिओमध्ये सासू-सुनेची भांडणे, पती-पत्नीच्या गंमतीजमती, घरात काय काय घडले, आज आम्ही काय खरेदी केली, कोणते पदार्थ बनवले, काही टुकार विनोद, कोण कसे पडले इत्यादी दाखवले जाते. ‘घरातील अंतर्गत आणि खासगी गोष्टी, वादविवाद हे सर्व कधीही उंबरठ्याबाहेर आणू नये’, असे म्हटले जाते; पण तरीही व्हिडिओजच्या माध्यमातून त्या समाजासमोर येतात. हे असे व्हिडिओ प्रसारित करणे, म्हणजे आपल्या घरात डोकावण्याची नव्हे, तर एक प्रकारे विनाकारण प्रवेश करण्याची संधी देण्यासारखे आहे. यातील काही व्हिडिओंमध्ये शिव्याही दिलेल्या असतात. अनेक जण केवळ मनोरंजन म्हणून किंवा वेळ आहे म्हणून असे व्हिडिओ पाहून त्यांना ‘लाईक’ही (आवडल्याचे) करतात. सध्या हे व्हिडिओ प्रसारित करणे, म्हणजे एक अर्थार्जनाचे साधन झाल्यामुळे कुणी काहीही चित्रित करून ते प्रसारित करतात.
थोडक्यात काय, तर अशा व्हिडिओंचा सध्या अतिरेक झालेला आहे. समाज त्यातच गुंतत चालला आहे. लहान मुलेही आता असेच व्हिडिओ पहाण्यात दंग होत असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळते. हे सर्व पाहून त्यांच्यावर काय संस्कार होणार ? याचाही विचार व्हायला हवा. ‘माझ्या कालच्या व्हिडिओला किती लाईक्स आले ? माझे फॉलोअर्स किती वाढले ? माझा व्हिडिओ किती जणांनी पाहिला ?’, अशा विचारांनीच दिवसाचा प्रारंभ होतो. या सर्वांचा परिणाम म्हणजे ‘आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे ? जगण्याची दिशा योग्य आहे का ?’, या सर्वांचा विचारच कुणी करत नाही. असे दर्जाहीन व्हिडिओ पाहून सद्सद्विवेकबुद्धी कशी जागृत होणार ? राष्ट्र आणि धर्म यांच्या उद्धारासाठी पावले कशी पडणार ? मनुष्यजन्माचे सार्थक कसे होणार ? प्रत्येकानेच या सर्वांचा सारासार विचार करून समाजकर्तव्याचे भान राखायला हवे !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.