श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हंपी (कर्नाटक) येथील माल्यवंत पर्वताच्या स्थानी असलेल्या ‘श्री रघुनाथ मंदिरा’चे घेतलेले दर्शन !
१. सीतेच्या विरहात दु:खी असतांना पार्वतीने श्रीरामरायाची घेतलेली परीक्षा !
‘२९.१.२०२१ या दिवशी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हंपी (कर्नाटक) येथे असलेल्या ‘नववृंदावन’ या ९ सिद्धांच्या समाधीस्थानी जाऊन आलो. त्याच दिवशी सायंकाळी आम्ही हंपी येथेच असणार्या माल्यवंत पर्वतावर असलेल्या श्री रघुनाथ मंदिरात दर्शनासाठी गेलो. श्रीरामराय वनवासात असतांना ४ मास या ठिकाणी थांबला होता. त्याने येथेच चातुर्मास केला होता. सीतेचे हरण झाल्यानंतर राम अत्यंत निराश झाला होता. तो प्रत्येक झाड, पशू-पक्षी, डोंगर, नद्या, नाले इत्यादींना विचारत होता, ‘अहो, माझी सीता पाहिलीत का ?’ तो अत्यंत भावनाशील होऊन विलाप करत सर्वत्र फिरत होता.
श्रीरामाची ही स्थिती पाहून सती पार्वतीला शंका येते, ‘राम हा श्रीविष्णूचा अवतार आहे, तर पत्नीसाठी मनुष्यासारखा असा विलाप आणि अती दुःख का करत आहे ? म्हणजे निश्चितच हा भगवंत नाही; कारण भगवंत हा सर्व दुःखांच्या पलीकडे आहे.’ ती शिवाला याविषयी विचारते. त्या वेळी शिव तिला सांगतो, ‘‘अगं पार्वती, अवताराचीच ही एक लीला आहे’’; पण पार्वतीला काही केल्या हे पटत नाही. ती म्हणते, ‘‘मी श्रीरामाची एक परीक्षा घेते.’’ ती सीतेचे रूप धारण करून याच पर्वतावर श्रीरामरायासमोर उभी रहाते. तेव्हा तत्क्षणी अत्यंत नम्रतेने श्रीरामचंद्र तिला विचारतो, ‘‘अगं आई, माझे पिता म्हणजे शिव कुठे आहेत ?’’ साक्षात् आदिमायेने घेतलेल्या परीक्षेत श्रीराम उत्तीर्ण होतो आणि तिला ओळखतोही. त्या वेळी सती पार्वतीला पटते, ‘खरंच श्रीराम हा भगवान विष्णुच आहे.’ ती श्रीरामाला म्हणते, ‘‘तुम्ही जर साक्षात् भगवंत आहात, तर मनुष्यासारखा असा विलाप करत सर्वत्र का फिरत आहात ?’’ त्या वेळी श्रीराम म्हणाला, ‘‘मलाही ‘मी भगवंत आहे’, हे सर्वांना कळू न देण्याची मर्यादा आहे. मला मनुष्यांमध्ये मनुष्यासारखेच मिळूनमिसळून राहिले पाहिजे’’; म्हणूनच श्रीरामाला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ ही उपाधी आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेही असेच आहे ना ! तेही स्वतः विष्णुस्वरूप असून कुणालाच ‘ते कोण आहेत ?’, हे कळू देत नाहीत. ‘मी काही करत नाही. सर्व देवच करतो’, असे ते म्हणत असतात.
२. श्रीराम साक्षात् भगवंत असूनही रावणाला मारण्यासाठी त्याला योग्य वेळेची वाट पहावी लागणे
श्रीराम साक्षात् भगवंत असल्याने सुग्रीव आणि अन्य वानरसेना यांना घेऊन तो लगेचच रावणावर चाल करून गेला असता; परंतु त्याने तसे केले नाही. त्याने ४ मास माल्यवंत पर्वतावर राहून चातुर्मास केला. मंदिरातील पुजार्यांना याचे कारण विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘भगवंत योग्य वेळेची वाट पहात होता. प्रत्येकाची वेळ यावी लागते, तसेच हे आहे. रावणाला मारण्याची वेळही सुनिश्चितच होती.’’
यातून ‘प्रत्यक्ष भगवंताच्या अवतारालाही समयचक्राने बांधून ठेवले आहे, तर मानवाची काय कथा ?’, हे लक्षात येते.
३. आठव्या शतकात चोल राजाने बांधलेल्या मंदिरातील अत्यंत सुबक आणि काळ्या पाषाणातील मूर्ती !
या पर्वतावर श्रीरामाचे सुंदर मंदिर आहे. हे मंदिर ८ व्या शतकात चोल राजाने बांधले आहे. येथील श्रीराममूर्ती बसलेल्या रूपात आहे. शक्यतो श्रीरामाची बसलेली मूर्ती कोठेही आढळत नाही. येथे मूर्तीच्या एका बाजूला लक्ष्मण आणि दुसर्या बाजूला सीतामाई यांच्या मूर्ती आहेत. हनुमंत श्रीरामाच्या समोर सीतेने दिलेल्या चूडामणीची खूण दाखवतांना ओंजळ पसरून बसला आहे. चारही मूर्ती अत्यंत सुबक आणि काळ्या पाषाणातील आहेत.
४. श्रीरामाने सुग्रीव आणि अन्य वानर यांच्यासह लंकेला जाऊन रावणाला मारण्याचे नियोजन करण्याचे ठिकाण असलेली गुहा !
या गुहेत राहून श्रीरामाने सुग्रीव आणि अन्य वानर यांच्यासह लंकेला जाऊन रावणाला मारण्याचे नियोजन केले होते. मंदिराच्या पाठच्या बाजूने गुहेचा आकार स्पष्टपणे दिसतो. ‘जणू शेषाने त्याचे छत्रच गुहेवर धरले आहे’, असा या गुहेचा आकार आहे. पुजार्यांनी आम्हाला त्या गुहेतील दगडाचा आकार मागून दाखवला. हा भाग वनात आहे. कधी कधी चित्ता, वाघ, असे वन्य प्राणी त्या भागात येतात. त्यामुळे ‘त्रेतायुगात या भागात श्रीरामराया ४ मास कसा राहिला असेल ?’, याची कल्पनाच केलेली बरी !
हे भव्य मंदिर पहातांना ‘त्या काळी एका पर्वतावर एवढे मोठे दगड नेऊन मंदिर कसे बांधले असेल ?’, याची कल्पनाही करवत नाही. खरेच, आपले महान पूर्वज, दैवी आणि धर्मशास्त्रसंपन्न शिल्पकार अन् त्यांना राजाश्रय देणारे राजे यांना आमचा कोटीशः प्रणाम !’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, नंद्याळ, आंध्रप्रदेश. (१.२.२०२१, सकाळी १०.३३)