ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण करण्याची मागणी करणारी याचिका वाराणसी न्यायालयाने स्वीकारली !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी परिसराचे पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण करण्याची हिंदु पक्षाची याचिका वाराणसी न्यायालयाने स्वीकारली आहे. यावर येत्या २२ मे या दिवशी सुनावणी होणार आहे. या याचिकेवर आक्षेप नोंदवण्यास मुसलमान पक्षाला न्यायालयाने १९ मेपर्यंत समयमर्यादा दिली आहे. हिंदु पक्षाकडून ४ महिलांनी याचिका प्रविष्ट केली आहे. यापूर्वी अलाहाबाद न्यायालयाने ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाचे ‘कार्बन डेटिंग’ (शिवलिंग किती जुने आहे ?, याची वैज्ञानिक चाचणी करणे) आणि वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता.
न्यायालयाने याचिका स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले की, ज्ञानवापी हे आदि विश्वेश्वराचे मंदिर असल्याचे सिद्ध करण्यासाठी आम्हाला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. या प्रश्नांची उत्तरे वैज्ञानिकदृष्ट्या ‘कार्बन डेटिंग’ आणि सर्वेक्षण यांतूनच मिळू शकतात. आज प्रविष्ट करण्यात आलेली याचिका याच प्रश्नांवर आधारित आहे.