जामिनासाठी नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार !
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यास सर्वाेच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी केलेल्या अर्जावर काय निर्णय होतो, याची वाट पहाण्याची सूचना सर्वाेच्च न्यायालयाने मलिक यांना दिली आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एम्.एम्. सुंदरेश यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. मलिक यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.
मुंबई उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्यामुळे मलिक यांनी सर्वाेच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. सर्वाेच्च न्यायालयात केलेल्या अर्जामध्ये मलिक यांनी माझी एक किडनी खराब असून दुसरी किडनी काही प्रमाणात कार्यरत आहे. याविषयी आरोग्य चाचणी करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केल्यास संमतीसाठी २ ते ३ आठवडे लागतात. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामीन त्वरित मिळावा, अशी मागणी सर्वाेच्च न्यायालयात अर्ज केला आहे. ‘मलिक यांनी कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंडमध्ये तीन एकर इतकी जागा दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्यासमवेत मिळून हडपली’, असा आरोप आहे. यामध्ये आर्थिक अपहार झाला असून यातील पैसा आतंकवादी कारवायांसाठी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नवाब मलिक सध्या कारागृहात आहेत.