महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेले विधी आणि त्यांची क्षणचित्रे
१. सहस्रचंद्र दर्शन शांतीविधी
‘पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून जीवनाडीपट्टीद्वारे महर्षींनी पुढील आज्ञा केली होती, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘सहस्रचंद्र दर्शन शांतीविधी’चा प्रारंभ १.५.२०२१ या दिवशी करावा आणि २.५.२०२१ या दिवशी ‘उत्तराषाढा’ हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जन्मनक्षत्र असतांना या विधीची पूर्णाहुती करावी.’ त्याप्रमाणे १.५.२०२१ या दिवशी संकल्प, गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, देवता आवाहन, पूजन, हवन इत्यादी विधी झाले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले या विधीचा संकल्प करू शकत नसल्याने त्यांच्या वतीने त्यांच्या उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी शांतीविधीचा संकल्प केला. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांनी पुण्याहवाचन विधी केला.
यानंतर पुरोहितांनी प्रधानदेवता, तसेच नवग्रहदेवता यांचे पूजन केले आणि नवग्रह होम करून विधीची प्रधान देवता ‘सहस्रसंख्याक दर्शन गुणविशिष्ट चंद्र’ याच्यासाठी तुपाच्या १ सहस्र ८ आहुती देण्यात आल्या. महर्षींच्या आज्ञेप्रमाणे २.५.२०२१ या दिवशी पूर्णाहुती करून या विधीची सांगता करण्यात आली.
क्षणचित्र
या विधीमध्ये यजमानाच्या जन्मनक्षत्राच्या देवतेसाठी हवन करण्यात येते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मनक्षत्राच्या देवतेसाठी हवन आरंभ झाल्यावर वातावरण अकस्मात् आल्हाददायक होऊन थंड हवेचा झोत यज्ञस्थळाच्या दिशेने आला. त्या वेळी ‘ही परात्पर गुरुदेवांच्या अवतारत्वाची प्रचीती आहे’, असे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले.
२. राजमातंगी याग
४.५.२०२१ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने ‘राजमातंगी याग’ करण्यात आला. या यागाचे वैशिष्ट्य असे की, महर्षि हा याग बहुतेक केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाच्या कालावधीतच करण्यास सांगतात. नित्याप्रमाणे या यागातही संकल्प, गणपतिपूजन, हवन, पूर्णाहुती इत्यादी विधी करण्यात आले. महर्षींच्या मार्गदर्शनानुसार या यज्ञामध्ये पिंपळाच्या समिधा, तूप आणि चरू (शिजवलेला भात) यांचे हवन करण्यात आले.
३. चंडी होम
५ आणि ६.५.२०२१ या दिवशी महर्षींनी ‘चंडी होम’ करण्यास सांगितले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे हा दोन दिवसीय यज्ञ करण्यात आला.
क्षणचित्र
हा यज्ञ जन्मोत्सवानिमित्त केलेल्या यज्ञांच्या शृंखलेतील शेवटचा यज्ञ होता. यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी अग्नीच्या ज्वाळा नेहमीच्या ज्वाळांपेक्षा अधिक तेजस्वी आणि गतीमान होत्या. श्रीचितशक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ज्वाळेत ‘मेषा’चे (मेंढ्याचे) दर्शन झाले. त्यांना प्रश्न पडला, ‘मला अग्नीत मेषाचे दर्शन का होत आहे ?’ त्यानंतर समजले की, मेष हा अग्नीचे वाहन आहे. याविषयी त्या म्हणाल्या, ‘‘पुरोहित साधक मंत्र म्हणत असतांना मला यज्ञकुंडातून सूक्ष्मातून मेष वर येतांना दिसायचा आणि आहुती दिल्यावर तो खाली जायचा. त्या वेळी तो मेष सुंदर दिसत होता. अन्य वेळी मेंढा पाहून चांगले वाटत नाही; पण या मेंढ्याकडे पाहून माझा भाव जागृत होत होता.’’
– श्री. अमर जोशी, सनातन पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.५.२०२१)