जळगाव येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करावे !
रणरागिणी शाखेचे जळगावच्या महापौरांकडे निवेदनाद्वारे मागणी !
जळगाव – हिंदु जनजागृती समितीप्रणित ‘रणरागिणी’च्या माध्यमातून प्रतिवर्षी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलीदानदिनानिमित्त शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकातील स्मारकाची स्वच्छता करून तेथे पुष्पहार अर्पण करण्याचा उपक्रम राबवला जातो. येत्या २६ मे या दिवशी राणी लक्ष्मीबाईचा बलीदानदिन आहे. सध्या या स्मारकाची स्थिती दयनीय झालेली आहे. जळगाव शहराला महिला महापौर आणि महिला आयुक्त लाभल्या असतांना राणीच्या स्मारकाची अशी स्थिती असणे योग्य नाही. त्यामुळे लवकरात लवकर स्मारकाचे सुशोभीकरण करून आवश्यक ते बांधकाम करून रंगरंगोटी करावी, तसेच स्मारकाच्या ठिकाणी विजेची व्यवस्था करावी या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून महापौर जयश्री महाजन यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. या निवेदनाची नोंद घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
स्मारकाची झालेली दुःस्थिती !
१. स्मारकाजवळ अतिक्रमण वाढलेले आहे. यात काही अनधिकृत फेरीवालेही आहेत.
२. स्मारकाची संरक्षक भिंत आणि तेथील लादीचा रंग पुष्कळ जुना झाला असल्याने त्यांची डागडुजी करणे अत्यावश्यक आहे.
३. स्मारकालगतचा मार्ग उंच झाल्याने स्मारकाची उंची न्यून वाटते.
४. स्मारकाला लागून असलेला पथदीप बंद आहे. त्यामुळे रात्री अंधार झाल्यावर स्मारक दिसतच नाही.
५. स्मारकाच्या परिसरातील कचर्यामुळे तेथे अस्वच्छता आहे.
६. स्मारकाजवळील बंद सिग्नलवर कापडी फलक लावले जातात. त्यामुळे स्मारकाचे विद्रूपीकरण होते. हा खांब काढायला हवा.
७. ‘रिक्शा स्टँड’च्या ठिकाणी लावलेल्या फलकावरही बॅनर लावल्याने स्मारक झाकले जाते. तो फलक काढायला हवा.