‘हनी ट्रॅप’चा वाढता धोका !
राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाच्या संस्थांपैकी एक असलेल्या ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ अर्थात् ‘डी.आर्.डी.ओ.’मधील शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुळकर यांना पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्राच्या आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. ‘ते व्हॉट्सॲप आणि ‘व्हिडिओ कॉल्स’ यांच्या माध्यमातून एका पाकिस्तानी दलालाच्या संपर्कात होते’, असा त्यांच्यावर आरोप आहे. कुरुळकर हे भारत सरकारच्या एका महत्त्वाच्या विभागात संचालक पदावर कार्य करत होते. अशा प्रकारचे दायित्व असणारे अनेक लोक हे सामाजिक माध्यमांवर उपलब्ध नसतात; परंतु कुरुळकर हे समाजमाध्यमांवर सक्रीय होते. कुरुळकर यांना झारा दासगुप्ता नावाच्या एका खोट्या खात्यावरून संदेश आला. त्या संदेशाला त्यांनी उत्तर दिले. पुढे त्या महिलेशी त्यांचा संवाद वाढला. ती त्यांना तिची अश्लील छायाचित्रे पाठवायला लागली. कुरुळकर यांना ती विविध प्रकारची गोपनीय माहिती विचारायला लागली. तिच्या आहारी गेलेले कुरुळकर तिला एक एक गोष्ट सांगायला लागले आणि ‘हनी ट्रॅप’मध्ये पुरते अडकले.
वर्ष २०१९ मध्ये राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देतांना संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले होते की, पाकिस्तानच्या आय.एस्.आय.कडून भारतीय सैन्यातील अधिकार्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याचे प्रयत्न वाढले आहेत. त्यामुळे सर्वांनी अधिक सावध रहाण्याची आवश्यकता आहे. यानंतर काही मासांतच भारतीय सैन्याने त्याच्या कर्मचार्यांना भ्रमणभाषमधून ८९ ॲप्स काढून टाकण्याचा समुपदेश दिला होता. यामध्ये फेसबुक, टिकटॉक, ट्रू-कॉलर आणि इन्स्टाग्राम या ‘ॲप्स’चा समावेश होता. असे असतांनाही आतापर्यंत संरक्षण क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी आणि सैनिक या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकतात, ही चिंताजनक गोष्ट आहे.
‘हनी ट्रॅप’ मुख्य हत्यार बनला आहे !
पाकिस्तानी सैन्य आणि त्याची गुप्तचर संघटना यांनी ‘हनी ट्रॅप’च्या माध्यमातून नव्या प्रकारे छुप्या कारवाया करणे चालू केले आहे. वर्ष २०१५ पासून ‘आय.एस्.आय.’ने ‘हनी ट्रॅप’ या युनिटसाठी अनुमाने ३ सहस्र ५०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक राखून ठेवले आहे. ‘आय.एस्.आय.’साठी हनी ट्रॅप किती महत्त्वाचे आहे, हे यावरूनच लक्षात येते. वर्ष २०१४ नंतर ‘हनी ट्रॅप’ची प्रकरणे मोठ्या प्रमाणात उघड झाली आहेत. पाकिस्तानने छेडलेल्या ‘प्रॉक्सी वॉर’चाच हा एक भाग आहे. भारतीय सैन्यासंबंधीची माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानकडून काही वरिष्ठ अधिकार्यांचे दूरभाष क्रमांक, कोणत्या ठिकाणी सैन्याचा सराव होणार आहे ? अधिकार्यांच्या नियुक्त्या, सैन्याच्या हालचाली, शस्त्रसाठा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आदी गोपनीय माहिती किंवा अन्य संवेदनशील माहिती घेण्याचा प्रयत्न हेरांच्या माध्यमातून केला जातो. ‘आय.एस्.आय’कडून अशा प्रकारचे ‘हनी ट्रॅप’ लावले जाणे, हा प्रकार पूर्वी अपवादात्मक घडायचा. आता तो एक ‘मुख्य हत्यार’ बनला आहे.
गेल्या वर्षी ब्रह्मोस मिसाईल सेंटर आणि डी.आर्.डी.ओ. यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या नागपूरमधील एका प्रकल्पामध्ये कार्यरत असणारा निशांत अग्रवाल हा ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अडकून त्याने ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती ‘आय.एस्.आय’ला दिल्याचे उघड झाले होते. त्याआधी उत्तरप्रदेशमधील नोएडामध्ये अच्युत प्रधान नावाचा बी.एस्.एफ्. सैनिकही अशाच स्वरूपाच्या ‘ऑपरेशन’मध्ये पकडला गेला होता. फेसबुकवरून तो ज्या मैत्रिणीशी चॅटिंग करत होता, त्या मैत्रिणीच्या फेसबुकच्या खात्यात ९० भारतियांचा समावेश होता. त्यांपैकी काही लष्करातील सैनिक किंवा अधिकारी होते. राजस्थानमधील अलवारमध्ये १९ वर्षांचा मुलगा ‘हनी ट्रॅप’मध्ये पकडला गेला होता. त्यापूर्वी अरुण मारवाह नामक हवाई दलाचा एक अधिकारीही ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याचे उघड झाले होते. त्याने अनेक महत्त्वाची छायाचित्रे आय.एस्.आय.ला दिल्याचे मान्य केले. वर्ष २०१७ मध्ये कल्याणमधून आरिफ माजिदी या तरुणाला पकडण्यात आले होते. ‘इसिस’ या आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनेशी त्याचा संबंध असल्याचे उघडकीस आले होते. आतातर ‘हनी ट्रॅप’च्या जागी ‘बाबा ट्रॅप’चा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. यात आध्यात्मिक गुरूंच्या बनावट प्रोफाईल सिद्ध करून सैनिकांना लक्ष्य केले जात आहे. आतापर्यंत १५० बनावट प्रोफाईल समोर आल्या आहेत. सामाजिक माध्यमे हे तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून वरदान ठरत असले, तरी प्रत्यक्ष त्यांची नकारात्मक बाजू देशाच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये उघडकीस आलेली ‘हनी ट्रॅपिंग’ची ९० टक्के प्रकरणे ही सामाजिक माध्यमांतून घडली आहेत, हे एका महत्त्वपूर्ण सर्वेक्षणात उघड झाले आहे.
भ्रष्टाचाराचा पैसाही कारणीभूत !
संरक्षण क्षेत्रातील अधिकारी-सैनिक आणि इतर कर्मचारी निवडीच्या प्रक्रियेत सुधारणेची आवश्यकता आहे, असे तज्ञांचे मत आहे. स्वाती मुखर्जी, उपदेश कुमार आणि मानस मंडल हे ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल रिसर्च’ या संस्थेचे ३ मुख्य सैनिकी मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी ‘Status of Military Psychology in India: A Review’ या संशोधन लेखात ‘हनी ट्रॅपिंग’ प्रकरणावर निर्बंधांसाठी अधिकारी किंवा शिपाई निवड प्रक्रियेत सुधारणा करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.
भारतीय गुप्तचर संघटना आणि सैन्य दल यांनी अधिक सतर्क होण्याची आवश्यकता आहे. संरक्षण क्षेत्रात काम करणारे वैज्ञानिक, कर्मचारी आणि अधिकारी यांनी ‘हनी ट्रॅप’चा धोका ओळखायला हवा. ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेल्या गुन्हेगारांवर ‘ऑफिशिअल सिक्रेट ॲक्ट’च्या अंतर्गत कारवाई न करता त्यांना देशद्रोहाच्या कलमांच्या अंतर्गत कडक शिक्षा दिली गेली पाहिजे. जेणेकरून कोणतीही व्यक्ती संरक्षणाशी संबंधित माहिती शत्रूराष्ट्राला पुरवण्याचे दुःसाहस करणार नाही.
भारतीय सैन्याला भेडसावणारी ‘हनी ट्रॅप’ची समस्या सोडवण्यासाठी सैनिकांना नैतिकता आणि साधना शिकवा ! |