साधकांमध्ये सेवेचा उत्साह निर्माण करणार्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या फोंडा, गोवा येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नम्रता शास्त्री (वय ७२ वर्षे) यांनी अनुभवलेली नागपूर येथील ‘हिंदु एकता दिंडी’!
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वर्ष २०२२ मध्ये झालेल्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त ठिकठिकाणी ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारी आणि दळणवळण बंदी यानंतर साधकांना प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात सेवेची संधी मिळणार होती. गेल्या २ वर्षांच्या कालावधीत समाजातील अनेक लोकांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले. या परिस्थितीत नागपूर येथील काही साधकांच्या मनाची स्थितीही नकारात्मक झाली होती. दिंडीच्या नियोजनापूर्वी साधकांची नकारात्मक स्थिती पाहून सौ. नम्रता शास्त्री (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७२ वर्षे) यांनी ‘साधकांमध्ये सेवेचा उत्साह निर्माण व्हावा’, यांसाठी केलेले प्रयत्न आणि दिंडीची सेवा करतांना साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. ‘हिंदु एकता दिंडी’चे नियोजन
१ अ. दिंडीचे नियोजन करतांना साधकांमध्ये नकारात्मकता जाणवणे : ‘८.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त नागपूर येथे दिंडी काढायची होती. त्यासाठी स्थानिक साधकांसाठी एक ‘ऑनलाईन’ सत्संग घेतला. ‘गुरुमाऊलींची कीर्ती सर्वत्र पसरवण्यासाठी दिंडी एक प्रभावी माध्यम आहे’, असे मी साधकांना सांगितले. सत्संगात दिंडीच्या नियोजनाबद्दल सांगतांना सेवा आणि त्यांचे दायित्व याबद्दल सांगितल्यावर कुणाकडूनच सकारात्मक प्रतिसाद आला नाही. पुनःपुन्हा विचारल्यावर काही जणांनी सेवांचे दायित्व घेण्याची सिद्धता दाखवली. साधकांची नकारात्मकता पाहून सत्संग तिथेच थांबवला.
१ आ. ‘साधकांची नकारात्मक स्थिती पाहून काय करावे ?’, असा विचार करत असतांना ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सनातनच्या ७४ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) संगीता जाधव यांचा लेख वाचल्यावर गुरुकिल्ली मिळाली’, असे वाटणे : त्या रात्री मला पुष्कळ वेळ झोप लागली नाही. ‘साधकांमध्ये नकारात्मकता असेल, तर दिंडी कशी निघणार ?’, या विचाराने मी अस्वस्थ झाले होते. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी शरण जाऊन प्रार्थना केली की, ‘गुरुदेवा, मी साधकांची नकारात्मकता घालवू शकत नाही. ‘त्यांना काय सांगू ?’, हेही मला कळत नाही. आपणच काहीतरी करा आणि मला मार्ग दाखवा !’ मला प्रार्थना करतांनाही पुष्कळ रडू आले. ७.४.२०२२ या दिवशी सकाळी ९.३० वाजता दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत असतांना त्यात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने पू. (सौ.) संगीता जाधव यांनी केलेले मार्गदर्शन आणि आलेल्या अनुभूती’, हा लेख वाचला. ‘गुरुदेव आपल्यासाठी किती करतात !’, याची मला जाणीव होऊन माझे डोळे भावाश्रूंनी भरून आले आणि ‘मला साधकांची नकारात्मकता घालवण्यासाठी जणू गुरुदेवांनी गुरुकिल्लीच दिली’, असे मला वाटले.
१ इ. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेला पू. (सौ.) संगीता जाधव यांचा लेख सत्संगात वाचल्यावर साधकांचा भाव जागृत होणे आणि ते सेवा करण्यासाठी उद्युक्त होणे : मी मनोमन कृतज्ञता व्यक्त करून सत्संगात पू. (सौ.) संगीता जाधव यांचा लेख वाचून दाखवला. तेव्हा सर्वच साधकांचा भाव जागृत झाला. सर्व जण म्हणाले, ‘‘आम्ही सेवेचे दायित्व घेऊ. आम्ही दिंडीत चालू.’’ हे ऐकून माझे मन कृतज्ञतेने भरून आले. काही साधकांनी प्रसाराच्या सेवेचे दायित्व घेतले. काही प्रत्यक्ष प्रसाराला जाऊ लागले. ज्यांना प्रत्यक्ष जाणे शक्य नाही, ते ‘व्हॉट्सॲप’ द्वारे प्रसार करू लागले. समाजातून प्रचंड प्रतिसाद मिळत होता. सर्वत्र उत्साहाची लाट आली आणि सर्व जण सेवेत मग्न झाले. सेवेत सहभागी होता न येणार्या साधकांनी सांगितले, ‘‘आम्ही दिंडीतील सर्वांसाठी सरबत, थंड पाणी आणि खाऊ देऊ.’’
२. दिंडीतील सेवेचा उत्साह वाढणे
२ अ. दिंडीसाठी बनवलेला धर्मध्वज पाहून साधकांचा सेवेतील उत्साह वाढणे, सर्व देवता, सद्गुरु आणि संत यांच्या कृपाशीर्वादाने ‘संपूर्ण वातावरणात भाव निर्माण झाला आहे’, असे साधकांना जाणवणे : साधकसंख्या अल्प आणि प्रत्यक्ष सहभागी होणारे साधक पुष्कळ अल्प होते. अशा परिस्थितीत ‘मोठ्या प्रमाणात दिंडी कशी काढायची ?’, हे मला समजत नव्हते. नंतर दिंडीसाठी नवीन धर्मध्वज सिद्ध केला. त्याचे छायाचित्र पाहून साधकांचा उत्साह वाढला. प्रसार आणि अन्य सेवा करतांना साधकांना पुष्कळ चैतन्य आणि ऊर्जा मिळत होती. त्या वेळी एका साधकाने दिंडीसाठी ‘भजनी मंडळ, वारकरी संप्रदाय, तसेच अन्य संप्रदाय यांना बोलावूया’, असे सुचवले. एका साधकाच्या साहाय्याने दिंडीतील सूत्रसंचालन आणि घोषणा यांची सिद्धता झाली. सर्व साधकांनी संपूर्ण शरणागतभावाने ध्येयाप्रती ध्यास धरून अविरत प्रयत्न करायला प्रारंभ केला. त्या वेळी सर्व देवता, सद्गुरु आणि संत यांच्या कृपाशीर्वादाने ‘संपूर्ण वातावरणात भाव निर्माण झाला आहे’, असे सर्व साधकांना जाणवले.
२ आ. पालखी सेवेत अनेक अडचणी येऊनही स्थिर राहून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना काय अपेक्षित आहे’, हे स्वीकारता येणे : ‘दिंडीतील पालखी म्हणजे दर्शन घेणार्या प्रत्येकाच्या हृदयमंदिरात गुरुपादुका विराजमान करण्याची सेवा आहे’, असा सौ. प्रांजली विजय ब्रह्मे यांचा भाव होता. त्यामुळे त्या सतत प्रार्थना करत भावावस्थेत राहून पालखीची सजावट करत होत्या. ‘पालखी सेवेत अनेक अडचणी येऊनही स्थिर राहून गुरुदेवांना काय अपेक्षित आहे’, हे स्वीकारता आले. आलेल्या अडचणींवर गुरुकृपेने मात करता आली. त्यासाठी कुटुंबीय आणि साधक यांच्याकडून साहाय्य मिळाले अन् अडचणीतूनही उत्तम मार्ग निघत होता.
३. दिंडीची सेवा करतांना आलेल्या अनुभूती
३ अ. फुले अर्पण घेण्यासाठी गेल्यावर फूल विक्रेत्याने ताजी टवटवीत फुले अर्पण करणे : सौ. प्रांजली विजय ब्रह्मे हिची फुले अर्पण म्हणून आणण्याची पहिलीच वेळ होती. त्या वेळी तिच्याकडून आपोआपच गुरुमाऊलींना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना झाली, ‘तुम्हाला ज्यांच्याकडून फुले हवी आहेत, तिकडे तुम्हीच मला घेऊन चला आणि तुम्हीच त्यांच्याशी बोला. मी केवळ निमित्तमात्र आहे.’ साधिका अर्पण घेण्यासाठी गेलेल्या प्रत्येक फूल विक्रेत्याने आनंदाने ताजी टवटवीत फुले अर्पण दिली. त्या वेळी साधिकेचा भाव जागृत झाला.
३ आ. अर्पणात आलेल्या फुलांना पाहून आपोआप प्रार्थना होणे : फुले घरी आणल्यावर फुलांचे वर्गीकरण करतांना आपोआप प्रार्थना झाली, ‘गुरुमाऊली, हे महाविष्णु, माझ्या हातातील उष्णतेचा फुलांना त्रास होऊ देऊ नका.’ फुलांकडे पाहून ‘ती फुले गुरुचरणी अर्पण होण्यासाठी अधीर झाली आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी ‘आम्हा सर्व साधकांनाही फुलांसारखे आपल्या चरणी समर्पित होता येऊ दे’, अशी माझी प्रार्थना झाली.
४. अन्य सूत्रे
अ. एका झाडावर पुष्कळ पक्षी बसले होते. त्यांचा किलबिलाट चालू होता. ‘त्यांच्या मधुर किलबिलाटात जणू ते महाविष्णूचा जयजयकार करत आहेत’, असे श्रीमती सुषमा बत्रा यांना जाणवले.
आ. भजनी मंडळाच्या भावपूर्ण भजनांनी सर्वत्र वातावरणात भावविश्व निर्माण झाले होते.
५. साधकांना आलेल्या अनुभूती
अ. साधकांनी आकाशाकडे पाहिल्यावर त्यांना आकाशातून देवता पुष्पवृष्टी करतांना दिसत होत्या. शंखनाद ऐकू येत होता. अनेक साधकांना श्रीमहाविष्णु आणि देवता मोठ्या प्रमाणावर चैतन्य अन् शक्ती यांचा वर्षाव करत असल्याची अनुभूती आली.
आ. पुष्कळ दिवसांपासून सतत रुग्णाईत असलेल्या साधिका प्रार्थना करून दिंडीत सहभागी झाल्या. ‘दिंडीत चालता येईल का ?’, हा विचार न करता शरण जाऊन आणि प्रार्थना करून त्या दिंडीत चालत होत्या. त्यातून त्यांना ऊर्जा आणि चैतन्य मिळाल्याने त्यांचे आजारपण कुठल्या कुठे पळाले.
इ. अनेक साधिकांना गुडघेदुखीचा प्रचंड त्रास असूनही गुरुदेवांच्या कृपेने त्या संपूर्ण दिंडीत चालू शकल्या. विष्णुलीला अनुभवता आल्याने सर्वांना पुष्कळ आनंद मिळाला.
ई. ‘या दिंडीने जो आनंद दिला, तो सर्वांत मोठा आहे’, असे साधकांनी सांगितले.
उ. नागपूरचा कडक उन्हाळा असूनही हवेत सर्वांनाच गारवा जाणवत होता. ‘गुरुदेव आमची काळजी घेत आहेत’, याची जाणीव सर्वांनाच होत होती.
६. दिंडीच्या वेळी समाजाकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद
अ. भावस्थितीत राहून केलेली पालखीची सजावट, आनंदाने फुललेले साधकांचे चेहरे, देवतांच्या नामाचा जयघोष आणि दिंडीतील चैतन्य अनुभवून एक हितचिंतक श्री. अश्विन झाले म्हणाले, ‘‘मी आजवर अनेक दिंड्या पाहिल्या; पण ही दिंडी म्हणजे दैवी दिंडी आहे.’’
आ. काहींनी दिंडीतील सर्वांना सरबत, थंड पाणी आणि खाऊ दिला.
इ. श्री दुर्गादेवीच्या मंदिरापासून ही दिंडी निघाली होती. प्रतिदिन देवळात येणार्या भाविकांनी सांगितले, ‘‘प्रतिदिन श्री दुर्गादेवीचे रूप जसे दिसते, त्यापेक्षा आजचे श्री दुर्गादेवीचे रूप पुष्कळ आनंदी आणि तेजस्वी दिसत आहे.’’
ई. श्री दुर्गादेवी मंदिराच्या विश्वस्तांनी पुष्कळ साहाय्य केले. मंदिराच्या आवारात साधकांना बसण्यासाठी आसंद्या ठेवल्या. दिंडीसाठी आलेल्या संतांसाठी वेगळी आसंदी दिली.
उ. ‘राणा प्रताप समिती’चे काही सदस्य श्री दुर्गादेवी मंदिरात आले होते. ते म्हणाले, ‘‘आम्हाला आज इथे येऊन पुष्कळ आनंद वाटत आहे. दिंडी दूरवर गेली, तरी आनंद जाणवत आहे.’’
या दिंडीतून मिळालेले चैतन्य अजूनही सर्वजण अनुभवत आहेत. कुणाच्याही चेहर्यावर थकवा नव्हता. सर्वजण आनंदी दिसत होते. परम पूज्य गुरुमाऊली ‘सर्वाना आनंदाच्या कारंज्याने न्हाऊ घालत आहे’, असे जाणवत होते. ‘ही सर्व श्रीविष्णूची लीला आहे’, असेच सर्वाना वाटत होते. ‘श्रीविष्णूची अगाध लीला अनुभवता आली’, त्याबद्दल त्याच्या चरणी सर्व साधक कोटीशः कृतज्ञ आहेत. ‘आपली गुरुमाऊली आपल्यासाठी किती करते !’, याची जाणीव खोल अंतर्मनात होऊन गुरुमाऊलींच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. कृतज्ञता गुरुदेव ! कृतज्ञता गुरुदेव ! कृतज्ञता गुरुदेव !’
– सौ. नम्रता शास्त्री (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७२ वर्ष ), फोंडा, गोवा. (२१.५.२०२२)