कोकण रेल्वे मार्गावर ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ लवकरच धावणार !
|
रत्नागिरी – लवकरच कोकण रेल्वे मार्गावरून ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ धावणार आहे. तिची चाचणी १६ मे या दिवशी घेण्यात आली. मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून पहाटे ५: ५३ वाजता सुटलेल्या ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ने मडगावपर्यंतचे ५९० किलोमीटरचे अंतर ६ तास ५७ मिनिटांत पार केले. १६ डब्यांची ही एक्सप्रेस दुपारी १२:५० वाजता मडगाव येथे पोचली आणि दुपारी १:१५ मुंबईसाठी रवाना झाली.
ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई-मडगाव मार्गावर या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. यामुळे पुढील काही दिवसांत गोवेकर आणि कोकणवासियांना अती जलद ‘वन्दे भारत एक्सप्रेस’मधून प्रवास करता येणार आहे. चाचणी झालेल्या या एक्सप्रेसने मुंबई ते रत्नागिरी हे अंतर ४ तास २७ मिनिटांत, तर पनवेल ते रत्नागिरी हे अंतर ३ तासांत पार पाडले.
Finally!!!
कोकणात “इलेक्ट्रिक पर्व” सुरू झाल्यानंतर आता पर्यंतची सर्वात आनंदाची बातमी! वंदे भारत एक्सप्रेसची पहिली चाचणी आज पार पडली. येत्या काही दिवसात कोकणात पण ही “White queen” धावताना दिसेल… #Rail_Love ❤️❤️#VandeBharatExpress @KonkanRailway @RailMinIndia pic.twitter.com/1OYSs0yAjk— Akshay Bhatkar (@Akkibhatkar) May 16, 2023
कोकण रेल्वेमार्गावर सर्वांत वेगवान वन्दे भारत एक्सप्रेस !
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते करमळी हे अंतर सध्या तेजस एक्सप्रेसला ८ तास ५० मिनिटे, छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव हे अंतर सुपरफास्ट कोकणकन्या एक्सप्रेस ला १० तास ४१ मिनिटे, जनशताब्दी एक्सप्रेसला ९ तास, तर मांडवी एक्सप्रेसला १२ तास लागतात. १६ मे या दिवशी चाचणी झालेल्या वन्दे भारत एक्सप्रेसने हे अंतर अवघ्या ६ तास ५७ मिनिटांमध्ये पार केले.
२०२३ पर्यंत ७५ वन्दे भारत एक्सप्रेस चालू होणार !
वर्ष २०२३ पर्यंत ७५ वन्दे भारत एक्सप्रेस चालू होणार आहेत. मुंबई-गांधीनगर या मार्गावर पहिली वन्दे भारत एक्सप्रेस चालू झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर वन्दे भारत एक्सप्रेस धावू लागली. तसेच मुंबईवरून शिर्डीसाठी वन्दे भारत एक्सप्रेस चालू झाली. आता चौथी गाडी कोकण रेल्वेमार्गावर लवकरच चालू होणार आहे.