गोव्याचा इतिहास पोर्तुगिजांच्या अत्याचारांनी भरलेला आहे, हे स्वीकारा ! 

केंद्रीय कला आणि संस्कृती राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांचे आवाहन

‘केतवन गॅलरी’चे उद्घाटन करतांना केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आणि इतर मान्यवर

पणजी, १६ मे (वार्ता.) – गोव्याचा इतिहास हा पोर्तुगिजांच्या अत्याचारांनी भरलेला आहे. गोमंतकियांनी हे सत्य स्वीकारले पाहिजे. गोव्यात मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली आणि चर्च बांधण्यात आले. गोव्यात धर्मांतर करण्यात आले. गोव्यातील इतिहास हिंसेने भरलेला आहे. पोर्तुगीज काळात गोमंतकियांचे शोषण करण्यात आले. इतिहासातून बोध घेऊन आपण भारतीय म्हणून एकसंघ राहिले पाहिजे. भारताचे विभाजन करणार्‍यांपासून आपण सावध राहिले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय कला आणि संस्कृती राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी केले. जुने गोवे येथे पुराभिलेख संचालनालयात ‘केतवन गॅलरी’चे उद्घाटन केल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी बोलत होत्या. या वेळी जॉर्जियाचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री अलेक्झांडर सुटिसिश्वली आणि जॉर्जियाचे धर्मगुरु अर्चिल खाचिडे यांची उपस्थिती होती.

केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी पुढे म्हणाल्या, ‘‘भारत आणि जॉर्जिया यांचे संबंध ऐतिहासिक स्वरूपाचे आहेत. ‘केतवन गॅलरी’ आता गोव्यात चालू झाल्याने गोवा आणि जॉर्जिया यांच्यामधील संबंध आता अधिक दृढ होतील. केतवनच्या राणीचे अवशेष १७ व्या शतकात गोव्यात आले होते. हे अवशेष गोव्यात कसे आले ? याविषयी संशोधन चालू आहे. केतवनच्या राणीचे अवशेष गोव्यात असल्याचा शोध वर्ष १९५८ मध्ये लागला होता. त्यानंतर पुराभिलेख खात्याने उत्खनन चालू केले. १६ वर्षे उत्खनन केल्यानंतर सेंट आगुस्तिन टॉवरनजिक केतवन राणीसह अन्य ८ जणांच्या देहांचे अवशेष सापडले.

भाग्यनगर येथील प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत काही अवशेष राणीचे, तर अन्य अवशेष धर्मगुरूंचे असल्याचे सिद्ध झाले. हे अवशेष पुराभिलेख खात्याने सांभाळून ठेवले होते. २ वर्षांपूर्वी जॉर्जिया सरकारने हे अवशेष त्यांच्या देशात दर्शनासाठी पाठवून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार भारत सरकारने ते जॉर्जियाला पाठवले आहेत. तेथील लोकांनी दर्शन घेतल्यानंतर हे अवशेष भारतात परत पाठवण्यात आले. ‘या अवशेषांचा काही भाग जॉर्जियामध्ये ठेवावा’, ही विनंतीही भारताने मान्य केली आहे. यामुळे भारत आणि केतवन देशांतील संबंध चांगले झाले आहेत.’’ या वेळी इतरांचीही भाषणे झाली. जुने गोवे येथील ‘केतवन गॅलरी’मध्ये केतवन राणीचे कार्य आणि इतिहास यांविषयी माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.